पुणे : परवानगी दिलेली असतानाहीयेरवडा कारागृहातील एका कैद्याला बी.कॉम.च्या परीक्षेला बसू न दिल्याबद्दल तपास अधिकारी, तुरुंग अधीक्षक व सरकारी वकिलांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस न्यायालयाने बजावली आहे. न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी हा आदेश दिला आहे. फेसबुकवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी शहरात उसळलेल्या दंगलीत हडपसर येथील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याचा खून झाला होता. या गुन्ह्यात हिंदूराष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह २२ संशयितांना अटक करण्यात आली आहे. हे संशयित सध्या येरवडा कारागृहात आहेत. आपल्याल बी. कॉम.च्या परीक्षेला बसू द्यावे, असा अर्ज यातील एका संशयिताने न्यायालयात केला होता. १३ मार्च २०१५ रोजी न्या. जे. टी. उत्पात यांनी मंजूर करून त्यासंबंधी हडपसर पोलिसांना व तुरुंग अधीक्षकांना तसे आदेश दिले होते.या संशयिताचा पहिला पेपर मंगळवारी होता. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला हडपसर येथील महाविद्यालयात परीक्षेसाठी नेले नाही. त्यामुळे कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल तपासी अंमलदार व सरकार पक्षाला कारणे दाखवा नोटीस बजावावी, असा अर्ज अॅड. मिलिंद पवार यांनी बुधवारी केला. न्यायालयाने त्याची दखल घेऊन तपासी अधिकारी, तुरुंग अधीक्षक व सरकारी वकिलांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती अॅड. पवार यांनी दिली.
तुरुंगाधिकाऱ्यांनी बुडविली कैद्याची परीक्षा
By admin | Updated: March 26, 2015 01:33 IST