पुणे : हडपसर येथील महाराष्ट्र शासनाच्या नावावर असलेली वन विभागाची तब्बल 18 एकर जागा माजी महसूल मंत्र्यांच्या बनावट आदेशानुसार थेट खासगी व्यक्तीच्या नावे करण्यात आली. याबाबत पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांनी तातडीने नोंद रद्द करून ही 18 एकर जमीन पुन्हा शासनाच्या नावे केली. अशा प्रकारे खोटी कागदपत्रे सादर करणा-याविरुद्ध खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोपट पांडुरंग शितकल असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. तहसीलदार तृप्ती कोलते यांनी याबाबत खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हवेली तालुक्यातील गुंठ्याला कोट्यवधी रुपये भाव असलेल्या मौजे हडपसर येथील स.नं. ६२ मधील तब्बल 7 हेक्टर 68 आर म्हणजे 18 एकर जमीन पोपट पांडुरंग शितकल यांनी चक्क तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच नावाने खोटा आदेश करून हवेली तहसीलदारांना सादर केला. परंतु या आदेशावर केवळ मंत्रीच नाही मंत्रालयातील कक्ष अधिकारी याची सही, खरी नकल असे सर्व कागदपत्र खोटी सादर केली. यामुळे संबंधित कागदपत्रांच्या आधारे नोंद घालण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये तलाठी व सर्कल यांनी तत्परता दाखवत नोंद मंजूर केली. याबाबत संशय आल्याने कोलते यांनी तपासणी सुरू केली आणि यामध्ये वस्तुस्थिती समोर आली.
दरम्यान, वन विभागाचे राहुल पाटील यांनी ही 18 एकर जमीन राखीव वन असून महसूल मंत्र्यांनी खरोखरच असे आदेश दिले का? याच्या तपासणीची मागणी केली. त्यानुसार कोलते यांनी थेट मंत्रालयात जाऊन चौकशी केली असता महसूल मंत्री यांनी संबंधित व्यक्तीचा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट आदेश दिल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्वरित संबंधित व्यक्तीची नोंद रद्द करून पुन्हा एखदा शासनाचे नावे जमीन करण्यात आली. याच वेळी खबरदारी घेत दुय्यम निबंधक यांना अशा सातबा-यांची खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नये, असे स्पष्ट आदेश दिले.
--------