पुणे : मनपाच्या वतीने बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या कामामध्ये बाधीत झालेल्या वसाहतीमध्ये पुनर्वसन करावे, यासाठी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास येरवडा क्षेत्रीय कार्यालयामध्ये घडला होता. यश चव्हाण (रा. विश्रांतवाडी), चाचा खान (रा. स्वातंत्र्यसैनिकनगर, येरवडा), यासीन तांबोळी (रा. इंदिरानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी उपअभियंता रमेश काकडे यांनी फिर्याद दिली आहे. काकडे येरवडा क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपअभियंता म्हणून नेमणुकीस आहेत. बीएसयूपी योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तसेच काही लाभार्थ्यांना अद्याप घरे मिळाली नसल्याच्या कारणावरून नागरिक व आई प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी येरवडा क्षेत्रीय कार्यालयातच आंदोलन केले होते. त्या वेळी विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न करण्यात आला होता. शासकीय कामात अडथळा आणून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा
By admin | Updated: September 5, 2015 03:29 IST