पुणे : मुलांमधील वाढत्या हिंसाचाराला परिस्थिती आणि त्यातून निर्माण होणारी विशिष्ट प्रकारची आक्रमक मानसिकता या गोष्टी कारणीभूत असतात. त्यांच्या हातून हिंसात्मक गोष्टी कशा घडू शकतात? हाच प्रश्न शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या मनात कायम ठेवण्यात आला आहे. ‘भिती’ हाच ‘प्लेग्राऊंड’ या चित्रपटाच्या सर्जनशीलतेचा गाभा असल्याचे मत दिग्दर्शक बाथो स्कोबास्की यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.पुणे आंतरराट्रीय चित्रपट महोत्सवात ( पिफ) जागतिक चित्रपट स्पर्धेअंतर्गत पोलंडचा ‘प्लेग्राऊंड’ हा चित्रपट दाखविण्यात आला. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निर्मात्या मेरिल्ला झेरादविच उपस्थित होत्या. ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक समर नखाते यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कौटुंबिक परिस्थितीमधून निर्माण झालेली मुलांची मानसिकता आणि त्यातून बळावत जाणारी हिंसक वृत्ती ही चित्रपटाची ढोबळमानाने रूपरेषा आहे, या चित्रपटाविषयी सांगताना ते म्हणाले, एका विशिष्ट पद्धतीने चित्रपटाच्या पटकथेने जन्म घेतला आहे. एका अपघाताची बातमी माझ्या वाचनात आली होती, त्या सत्यघटनेवर आधारित बातमीचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. मग त्याच्या मुळाशी जाण्याकरिता मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास, मुलाखती आणि पोलिसांच्या मानसिकतेतून समोर आलेली निरीक्षणे, संशोधन यातून अशा घटना घडण्यामागे कोणतेच ठोस कारण नसल्याचा निष्कर्ष समोर आला आणि चित्रपटाचे कथानक गवसले. आजपर्यंत अशा प्रकारचा चित्रपट कधीच केला नव्हता. सत्यघटनेमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. मात्र चित्रपटात जाणीवपूर्वक मुलीचे पात्र घेण्यात आले आहे. तिचे पात्र प्रेक्षकांना कथानाकाच्या विशिष्ट आयामापर्यंत घेऊन जाते. चित्रपटातील पात्र वास्तववादी वाटावीत याकरिता नऊ महिने पात्रांची आॅडिशनमधून शोध मोहिम सुरू होती. (प्रतिनिधी)
‘भीती’ हा चित्रपटाच्या सर्जनशीलतेचा गाभा
By admin | Updated: January 14, 2017 03:29 IST