बारामती : चुलतभावाच्या खूनप्रकरणी एकास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एम. पोतदार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जमिनीच्या वादातून १० जानेवारी २०१३ रोजी लोणारवाडी (ता. दौंड) येथे ही घटना घडली होती. महानवर कुटुंबीयाच्या येथे बकऱ्या व मेंढ्या चरण्यासाठी होत्या. १० जानेवारी रोजी रात्री शेतात बसविलेल्या बकऱ्यांच्या वागरीच्या एका बाजूला शेवंताबाई महानवर व दुसऱ्या बाजूला त्यांचा मुलगा सुखदेव महानवर व सुखदेवचा चुलतभाऊ सतपाल महानवर झोपले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे, ११ जानेवारी रोजी सकाळच्या वेळी सुखदेव यास उठविण्याचा त्याची आई शेवंताबाई यांनी प्रयत्न केला. मात्र, सुखदेव हा मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या नाकातोंडातून रक्त येत असल्याचे शेवंताबार्इंना दिसून आले. सुखदेव याच्या शेजारी रात्री सतपाल हाच झोपलेला होता. परंतु, सुखदेव रात्रीच तेथून निघून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे सतपाल यानेच सुखदेव याचा खून केल्याची फिर्याद शेवंताबाई यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकारी जी. बी. पांढरे यांनी केलेल्या तपासात सतपाल यानेच सुखदेव याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. तसेच, घटनेच्या ठिकाणावरून रात्रीच्या वेळी सतपाल हा पळून जाताना शेजारील शेतकऱ्यांनी पाहिले होते. सरकारी पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. या वेळी युक्तिवाद करताना अॅड. संदीप ओहोळ यांनी या खटल्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, अशा स्थितीत हा गुन्हा परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे, असा युक्तिवाद केला. (वार्ताहर)
चुलतभावाच्या खूनप्रकरणी जन्मठेप
By admin | Updated: December 24, 2015 00:47 IST