पुणे : येत्या सोमवारपासून (दि. ११) न्यायालयाचे कामकाज नियमित सुरू होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालय आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲंड. गोवाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (दि. ५) मुंबईत झाली. त्यात झालेल्या चर्चेत नियमित कामकाजाबाबत उच्च न्यायालयाने सकारात्मकता दर्शवली.
मुंबईतल्या या बैठकीस उच्च न्यायालयातील न्यायाधीश, पदाधिकारी, बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. सुदीप पासबोला, माजी अध्यक्ष ॲड. सुभाष घाडगे, ॲड. विठ्ठल कोंडे-देशमुख, सदस्य ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. उदय वारुंजीकर आणि मुंबई बार असोसिएशनचे अध्यक्ष व सचिव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या नऊ महिन्यांपासून न्यायालयात केवळ महत्त्वाच्या आणि तत्काळ प्रकरणांवरच सुनावणी होत आहे. त्यामुळे न्याय मिळण्यास पक्षकार आणि वकिलांना विलंब लागत आहे. ऑक्टोबरपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर, न्यायालयाचे कामकाज पूर्ववत सुरू होण्याची अपेक्षा होती. परंतु, न्यायालयात नियमित सुनावणीबाबत ‘तारीख पे तारीख’च सुरू आहे. मात्र, आता येत्या पुढील दोन-तीन दिवसांत अंतिम निर्णय होऊन कामकाजाची कार्यपद्धती असलेली नियमावली (एसओपी) जाहीर होऊ शकते.
ज्या जिल्ह्यात अद्याप पूर्णपणे कामकाज सुरू झालेले नाही, तेथील कोरोनाच्या स्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच न्यायालयीन कामकाजातील अडचणी समजून घेत त्या दूर करण्यासंदर्भात चर्चा झाली. पुण्यातील कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता. ११) नियमित कामकाज सुरू होऊ शकते, असे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲंड. गोवा चे सदस्य ॲड. राजेंद्र उमाप यांनी सांगितले.