लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील सफाईचे काम करण्यासाठी अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे आता हे काम १ आॅगस्टपासून आउटसोर्सच्या माध्यमातून करण्यात येणार आहे़ पुणे बार असोसिएशनने याबाबत अनेकदा तक्रारी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे़ न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर झाडी असून त्यामुळे दररोज पालापाचोळ्याचा कचरा साठतो़ त्यात पाऊस सुरू असल्याने हा पालापाचोळा कुजतो व त्याचा वास परिसरात येत राहतो़ अस्वच्छतेमुळे न्यायालयात येणारे पक्षकार, वकील आणि न्यायिक अधिकाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. न्यायालयाच्या आवारातील भिंती आणि पायऱ्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसतात. आवारात कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या उपलब्ध नाहीत. न्यायालयात न्याय मिळण्याच्या अपेक्षेने येणाऱ्या पक्षकारांसाठी येथे पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्याची अडचण, आवारात बसण्यासाठी चांगली सुविधा नाही. कचरा आणि घाणीचे साम्राज्य, अस्वच्छ स्वच्छतागृहे, त्यातून येणारी दुर्गंधी यामुळे न्यायालयाच्या हॉलबाहेरही पक्षकारांना नाक दाबून थांबावे लागते. महिला पक्षकारांचीही स्वच्छतागृहे स्वच्छ नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होते. न्यायालयात वेळेवर सफाई होत नाही. त्यामुळे ही कामे आउटसोर्सच्या माध्यमातून करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड़ राजेंद्र दौंडकर यांनी सांगितले़ गुरुवारी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी जिल्हा न्यायालयात आले़ त्यांनी संपूर्ण परिसराची स्वच्छता केली़ यापूर्वी न्यायालयातील साफसफाई आउटसोर्समार्फत केली जात असे़ परंतु, ज्या कंपनीकडे याचा ठेका होता़, ते जेवढे कर्मचारी कामावर आहेत़, त्यापेक्षा अधिक कर्मचारी कामावर असल्याचे दाखविले जात होते़ त्यामुळे त्यांच्याकडून सहा महिन्यांपूर्वी हे काम काढून घेण्यात आले होते़ जिल्हा न्यायाधीश एस. एन. मोडक यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी न्याय व विधी विभागाकडे पुन्हा पाठपुरावा करून नवीन टेंडर मंजूर करून घेतले़ त्यामुळे आता नव्या कंपनीकडे काम देण्यात आले आहे. - अॅड़ राजेंद्र दौंडकर, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन
न्यायालयातील साफसफाई आता आउटसोर्सिंगद्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 4:29 AM