पुणे : राज्य शासनाकडून महापालिका हद्दीत ३४ गावांबरोबरच आणखी नवीन ४ गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आज महापालिकेच्या विधी समितीसमोर ठेवण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावाची माहिती देण्यासाठी विधी विभाग आणि नगर अभियंता व इतर विभागांचा एकही अधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी उपलब्ध नसल्याने संतापलेल्या विधी समिती सदस्यांनी या गैरहजर अधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी थेट आयुक्तांच्या कार्यालयातच ही बैठक घेतली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे आयुक्तांच्या दालनात एकच गोंधळ उडाला.दरम्यान, गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या सदस्यांनी ही बैठक तहकूब केली. गेल्या ३-४ विधी समितीच्या बैठकांना एकही अधिकारी उपस्थित नसल्याने सर्व सदस्यांनी अधिकाऱ्यांच्या वर्तनाविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली. तसेच, अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी थेट आयुक्तांच्या दालनातच बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. विधी समिती अध्यक्षा अश्विनी जाधव यांच्या नेतृत्वाखाली अस्मिता शिंदे, पुष्पा कनोजिया, मंजूषा नागपुरे, कल्पना थोरवे, लक्ष्मी दुधाणे, सचिन दोडके आणि श्रीनाथ भिमाले या सदस्यांनी थेट आयुक्तांचे कार्यालय गाठले. आयुक्तांच्या कार्यालयात बैठकीला सुरुवातही करण्यात आली. आयुक्त कुणाल कुमार यांनी समिती सदस्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले; तसेच यापुढे अधिकारी बैठकीला गैरहजर राहणार नाहीत, अशी ग्वाही दिल्यानंतर नगरसेवकांनी बैठक तहकूब केली. दरम्यान, आज तहकूब करण्यात आलेली ही बैठक १५ दिवस पुढे ढकलण्यात आली असून, त्यामुळे या नवीन गावांबाबतचा निर्णयही लांबणीवर पडला आहे.(प्रतिनिधी)
नगरसेवकांचा आयुक्तांसमोरच ठिय्या
By admin | Updated: November 5, 2014 23:31 IST