पुणे : कोरोना नियंत्रणासाठी मॉडर्ना, कोव्हिशिल्ड, फायझर आणि स्पुटनिक या चार लसींच्या मानवी चाचण्या तिस-या टप्प्यात आहेत. मार्च महिन्यापर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होईल, असे भाकित केले जात आहे. त्यादृष्टीने महापालिका, जिल्हा आणि विभाग स्तरावर लसींच्या साठवणुकीची क्षमता वाढवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी राज्य सरकारशी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.
कोणतीही लसीची साधारणपणे २ ते ८ डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये साठवणूक, वाहतूक आणि वितरण केले जाते. प्रत्येक महानगरपालिका, जिल्हा आणि विभाग स्तरावर लसींच्या साठवणुकीची व्यवस्था केलेली असते. त्यासाठी आईस लाईन रेफ्रिजरेटर आणि वॉक इन कूलर सज्ज असतात. एका रेफ्रिजरेटरमध्ये अंदाजे ५-६ हजार डोस स्टोअर केले जाऊ शकतात.
प्रत्येक लसीचे पॅकिंग, त्यासाठी वापरले जाणारे साहित्य, एका व्हायलमधील डोसची संख्या यावर साठवणूक क्षमता ठरलेली असते. पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत सध्या ५५-६० आईस-लाईन रेफ्रिजरेटर आहेत. १० रेफ्रिजरेटर वाढवण्याची मागणी लसीकरण विभागातर्फे करण्यात आली आहे.
--------------
सध्या आरोग्य विभागाकडे १० लाख डोस साठवण्याची क्षमता आहे. त्यासाठी १२ आईस लाईन रेफ्रिजरेटर आणि १ वॉक इन कूलर आहे. प्रत्येक जिल्हा, महानगरपालिका, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्याकडे लसींच्या क्षमतेची यंत्रणा असते. कोरोनाची लस आल्यावर त्याची साठवणूक, वाहतूक, वितरण यासाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. साठवणूक क्षमता दुप्पट करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाशी संपर्क साधण्यात आला आहे.
- डॉ. संजय देशमुख, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे विभाग
--------------
पुणे महापालिकेकडे ५५-६० आईस लाईन रेफ्रिजरेटर आहेत. महापालिकेच्या विविध दवाखान्यांमध्ये रेफ्रिजरेटरची व्यवस्था आहे. नारायण पेठ येथील केंद्रात सर्वाधिक रेफ्रिजरेटर आहेत. गोवर, रुबेलाच्या लसींचे ८-१० लाख डोस आपण स्टोअर केले होते. दर वर्षी पोलिओचे तीन-चार लाख डोस येतात. कोरोनाच्या लसींचे पॅकिंग, मटेरियल, व्हायलची क्षमता, साठवणुकीचे तापमान यानुसार किती साठवणूक होऊ शकते, याचा अंदाज बांधता येईल. आणखी १० रेफ्रिजरेटरची मागणी करण्यात आली आहे.
- डॉ. अमित शहा, वैद्यकीय अधिकारी, लसीकरण विभाग, पुणे महापालिका
-----------------
आरोग्य संचालनालयाकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि तिथून जिल्हा रुग्णालय, महापालिका, प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा पध्दतीने लसींचे वितरण केले जाते. औंध जिल्हा रुग्णालयात साधारणपणे १५,००० डोस साठवणुकीची क्षमता आहे. एका व्हायलमध्ये किती डोस बसतात, यावर क्षमता ठरते.
- डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक
---------------
कोणाला मिळणार लस?
कोरोनाची सर्वप्रथम सरकारी आणि खाजगी आरोग्य कर्मचा-यांना दिली जाणार आहे. या माहितीचे संकलन करण्याचे काम केंद्र आणि राज्य पातळीवर सुरु आहे. सर्व माहिती संकलित करुन झाल्यावर पहिल्या टप्प्यात किती जणांना लस दिली जाणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर सहव्याधी असलेले रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांची माहिती एकत्रित केली जाणार आहे.