लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : घरेलू कामगार मंडळातील नोंदणीचे नूतनीकरण केलेले नसले तरीही कोरोना निर्बंधातील दीड रुपये मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील ५ लाख गरजू घरेलू कामगार महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व घरेलू कामगार कल्याण मंडळाचे माजी सदस्य सुनील शिंदे यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारने मदत जाहीर करताना ती मंडळातील नोंदणीचे नियमित नूतनीकरण असलेल्या कामगारांनाच मिळेल, असे जाहीर केले होते. अशा कामगारांची संख्या अवघ्या काही हजारांत होती. पुण्यात तर असे फक्त तीनशे कामगार होते.
मात्र, नूतनीकरण न होण्यामागे मंडळाचे कामकाजच बंद झाल्याचा दोष असल्याचे शिंदे यांनी सरकारच्या निदर्शनास आणले. शिंदे यांनी सांगितले की, सन २०१६ नंतर तत्कालीन राज्य सरकारने मंडळाचे पुनरुज्जीवनच केले नाही. कामगार आयुक्त कार्यालयांच्या माध्यमातून होणारी नोंदणी त्यामुळे बंद झाली व नोंदीचे नूतनीकरणही झाले नाही. हे लक्षात घेऊन सरकारने सन २०११ पासून नोंदणी असलेल्या सर्व घरेलू कामगारांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित कामगारांनी आवश्यक कागदपत्रांसह वाकडेवाडी येथील कामगार उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा. ही मदत मिळवून देण्यासाठी म्हणून कोणी पैसे वगैरे मागितले तर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचेही सरकारने जाहीर केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.