लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ‘स्ट्रेन’चा महाराष्ट्रतही शिरकाव झाला आहे. ब्रिटनहून महाराष्ट्रात परतलेल्या आठ जणांमध्ये हा ‘स्ट्रेन’चे विषाणू आढळून आले. यातले ५ जण मुंबईतले आहेत. पुणे, मीरा भाईंदर आणि ठाण्यातील प्रत्येकी एका प्रवाशालाही याच कोरोनाने गाठले आहे. राष्ट्रीय विषाणु संस्थेने (एनआयव्ही) दिलेल्या या अहवालामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. मात्र पुण्यातला रुग्ण पूर्ण बरा होऊन घरीही गेला आहे.
ब्रिटनहून महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांच्या सर्वेक्षणाची विशेष मोहिम शासनाने हाती घेतली आहे. त्यानुसार दि. २५ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात परतलेल्या ४ हजार ८३६ प्रवाशांचा शोध घेण्यात आला. यातल्या ३ हजार ३९० प्रवाशांच्या आरटी-पीसीआर चाचणीत ७२ प्रवाशांचे नमुने ‘पॉझिटिव्ह’ आढळून आले. त्यामध्ये सर्वाधिक ३० प्रवासी मुंबईतील तर १४ प्रवासी पुण्यातील आहेत. बाधित प्रवाशांपैकी ६८ जणांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या पडताळणीसाठी पाठविण्यात आले होते. यातल्या आठ जणांना ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या ‘स्ट्रेन’चा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
‘आयसीएमआर’च्या नियमावलीनुसार या प्रवाशांना अन्य बाधित रुग्णांपासून विलग करण्यात आले आहे. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनच्या संक्रमणाचा वेग तुलनेने अधिक असल्याने ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. आता या विषाणुने महाराष्ट्रातही शिरकाव केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
चौकट
ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांची स्थिती
एकुण प्रवाशांचा शोध - ४,८३६
भारतात आल्यानंतर २८ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण - ८२२
आरटी-पीसीआर चाचणी - ३३९०
कोरोना बाधित - ७२
(मुंबई - ३०, पुणे - १४, ठाणे - ८, नागपुर - ९, औरंगाबाद, रायगड व बुलढाणा - प्रत्येकी २, उस्मानाबाद, नांदेड व वाशिम - प्रत्येकी १)
चौकट
स्वच्छता, मास्क आणि शारीरिक अंतर
“एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांमध्ये आठ जणांचे नमुने नव्या स्ट्रेनचे आढळले. प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या विषाणुचा वेगाने संसर्ग होऊ शकतो. मात्र, नागरीकांनी घाबरून जाऊ नये. सर्वांनी मास्क, हाताची स्वच्छता, शारीरिक अंतर या गोष्टींचे पालन करावे.”
- राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्यमंत्री
---------
पुण्यातील रुग्ण ‘निगेटिव’ होऊन घरीही गेला
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना विषाणुच्या नवीन स्ट्रेनची बाधा झालेला पुण्यातील रुग्ण सोमवारी (दि. ४) बरा होऊन घरीही परतला आहे. तसेच या रुग्णाच्या कुटूंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची लागण झालेली नसल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
ब्रिटिनमधील कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे आठ रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. त्यापैकी एक रुग्ण पुण्यातील आहे. हा प्रवासी १३ तारखेला ब्रिटनहून पुण्यात आला होता. चाचणी केल्यानंतर तो बाधित आढळून आला.
त्यानंतर १७ डिसेंबरला त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची चौदाव्या व पंधराव्या दिवशी पुन्हा चाचणी करण्यात आली. या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या. त्यामुळे त्यांना सोमवारी (दि. ४) घरी सोडण्यात आले. त्यांच्या कुटूंबातील अन्य सदस्यांचे कोरोना अहवालही निगेटिव्ह आले असल्याची माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
दरम्यान, संबंधित रुग्णाला कोणतीही लक्षणे नव्हती. कुटूंबातील इतरांनाही कोरोनाची लागण झालेली नाही. हा रुग्ण गोखलेनगर परिसरातील असल्याचे समजते. इंग्लंडहून परतलेल्या एकूण १४ बाधितांपैकी केवळ एकाच प्रवाशामध्ये विषाणुचा नवीन स्ट्रेन आढळून आल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
------------