पुणे : प्रत्येक क्षेत्रासाठी वर्षभरात वातावरण कसे राहील, याची प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते़ आरोग्य, वीजपुरवठा, वाहतूक, शिपिंग अशा विविध क्षेत्रांना त्यांच्या गरजेनुसार हवामानविषयक सुविधा पुरविण्यात येणार आहे़ त्यादृष्टीने त्या-त्या क्षेत्राची नेमकी गरज काय आहे, याची माहिती सध्या हवामान विभागाकडून घेतली जात आहे़वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून एका ठिकाणाहून दुसऱ्या लांबच्या ठिकाणी वीज वाहून नेली जाते़ या वहनात विजेची तूट होते़ या तारा उघड्यावर असल्याने वातावरणानुसार व विभागानुसार त्याचे नुकसानीचे प्रमाण कमीजास्त असते़ त्यामुळे एखाद्या ठिकाणचे तापमान अधिक असेल, तर वहनातील तूट ही अधिक असते़ त्यानुसार त्या-त्या भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अधिक पुरवठा करण्याची गरज असते़ वीज उत्पादन व तिचे वितरण करणाऱ्या कंपन्यांची गरज ओळखून हवामान विभागाद्वारे त्यांना तापमानाची माहिती पुरविली जाणार आहे़ त्याच पद्धतीने वेगवेगळ्या तापमानात वेगवेगळे आजार उद्भवत असतात़ त्यादृष्टीने आरोग्य विभाग, डॉक्टरांच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्यांना हवामानविषयक माहिती दिली जाणार आहे़ अशा प्रकारे समुद्रातील वातावरणाच्या अचूक माहितीसाठी नाविक दल व इतरांसाठी विशेष माहिती दिली जाणार आहे़ त्यासाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ़ अरविंदकुमार श्रीवास्तव आणि डॉ़ पी़ सी़ एस़ राव यांनी सांगितले़ सध्या देशभरातील महामार्गांवर किती तापमान असेल, तेथे पावसाची नेमकी काय स्थिती असू शकते, याचा अंदाज व्यक्त केला जातो़ त्यासंबंधी वेबसाईटवर स्वतंत्र आॅप्शन देण्यात आला आहे़ याशिवाय, त्यावर टोलफ्री क्रमांकही देण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)
हवामान विभागातर्फे सुविधा
By admin | Updated: March 23, 2017 04:30 IST