पिंपरी : जी. के. फॉर्च्युन या बांधकाम संस्थेच्या पिंपळे सौदागर येथील झुलेलाल टॉवर या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी बुधवारी मजूर महिलेचा डोक्यात लाकडी वासा पडून मृत्यू झाला. सतरूपा यादव या मजूर महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदारांविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. गोपाल चन्नया सूर्यवंशी (वय ४३, रा. जगताप डेअरी, रहाटणी, मूळ गाव तेलंगणा) या ठेकेदारास अटक करण्यात आली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावरून लाकडी वासा डोक्यात पडून बुधवारी मजूर महिलेचा मृत्यू झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहचण्यास तब्बल आठ तासांचा अवधी गेला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ नये, प्रकरणाची वाच्यता होऊ नये, याची पुरेपूर खबरदारी घेतली गेली. पोलिसांनी या प्रकरणी दखल घेऊ नये, याकरता दबाव तंत्राचा अवलंब करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक, संबंधित ठेकेदाराने कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा साधने पुरवली नसल्याचे उघड होईल, निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला, ही बाब निदर्शनास आली, तर कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. महिलेच्या वारसांना, कुटुंबीयांना भरपाई द्यावी लागेल. हे सर्व टाळण्यासाठी कोणालाही काही समजण्याच्या आत परस्पर प्रकरण मिटविण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. परंतु, लोकमतने या प्रकरणी पाठपुरावा केल्यामुळे प्रकरणाची दखल घेतली गेली. पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला. ठेकेदाराला अटकसुद्धा झाली आहे. त्यामुळे बांधकाम कामगार सेनेने लोकमतचे आभार मानले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या महिलेची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिला दोन लहान मुले आहेत. पती मोलमजुरीचे काम करतात. घडलेल्या घटनेबद्दल आवाज उठविणारे, न्याय मागणारे कुटुंबात कोणीच नाही. या परिस्थितीचा गैरफायदा उठविण्याचा ठेकेदाराकडून प्रयत्न झाला. -----दक्षतेचा अभावपिंपळे सौदागर येथील गृहप्रकल्पाच्या ठिकाणी दुर्घटना घडली. त्या ठिकाणी कोणतीही दक्षता घेतली गेली नव्हती. इमारतीचे काम सातव्या मजल्यापर्यंत सुरू आहे. उंचावर काम सुरू असताना कोठेही सुरक्षा जाळी लावलेली नव्हती. मजूरांना हेल्मेट उपलब्ध करून दिलेली नाहीत. सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतीच काळजी घेतली नसल्याची बाब निदर्शनास आली असून, निदान यापुढे तरी या घटनेतून बोध घेऊन बांधकाम व्यावसायिकाने सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत. अशा घटना घडल्यानंतरही दक्षता घेतली जात नसेल, तर बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.बिल्डरवरही गुन्हा दाखल कराबांधकाम मजुरांना सुरक्षा साधने पुरविण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकाची आहे. मजुरांना सुरक्षा साधने न पुरविता निष्काळजीपणा दाखविल्याने महिलेचा जीव गेला. सुरुवातीला पोलिसांपर्यंत प्रकरण जाऊ नये, याचा प्रयत्न झाला. नंतर गुन्हा दाखल झाला, तो ठेकेदारावर. परंतु, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध दाखल होणे आवश्यक आहे, अशी मागणी बांधकाम कामगार सेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख जयंत शिंदे आणि उपजिल्हाप्रमुख किशोर हातागळे यांनी केली आहे. या प्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांना देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मजूर मृत्यूप्रकरणी ठेकेदारास अटक
By admin | Updated: September 27, 2015 01:15 IST