पुणे : महापालिकेच्या विविध विभागांतील कंत्राटी कामगारांना साप्ताहिक सुट्टीबरोबरच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीचा पगार देण्यात यावा, असे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. याशिवाय यापुढील काळात या कामगारांना कायद्यानुसार वेतन न देता त्यात कपात करण्याचा घाट घातला गेल्यास संबंधित ठेकेदारास ब्लॅकलिस्ट करण्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेच्या विविध विभागांत दैनंदिन सेवा पुरविण्यासाठी घनकचरा, पाणीपुरवठा तसेच सुरक्षा विभागात झाडणकाम, रखवालदार, बिगारी, कंत्राटी कामगार घेतले जातात. ते पुरविण्यासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवून हे काम ठेकेदारांना दिले जाते. त्यासाठी महापालिकेकडून या कर्मचाऱ्यांना वेतन न देता, ते थेट ठेकेदारास दिले जाते. मात्र, हे देताना ठेकेदाराने कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार देणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ठेकेदारांकडून वेगवेगळ्या करांच्या नावाखाली या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करून त्यांना नियमापेक्षा कमी वेतन दिले जात असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यानुसार कंत्राटी कामगारांना मासिक वेतन किमान १२ हजार रुपये मिळणे आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र ६ हजार रुपयेच दिले जाते. त्याविरोधात महापालिकेत आंदोलनही करण्यात आले होते. त्याची दखल घेत आयुक्त कुणाल कुमार यांनी सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. आदेशातील काही प्रमुख सूचना ४कंत्राटी कामगारांना मासिक वेतन कोणत्याही परिस्थितीत ७ तारखेच्या आत द्यावे. ४पालिकेने ठेकेदारास किमान वेतन दरामध्ये बोनस दिला असल्यास ठेकेदाराने तो कामगारांना महिन्याला द्यावा. ४किमान वेतन कायद्यातील तरतुदीनुसार, कंत्राटदाराने कंत्राटी कामगारास भरपगारी साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक केले आहे.४साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कर्मचारी कामावर असल्यास त्यास बदली सुट्टी अथवा त्या दिवसाचे किमान वेतन देण्यात यावे.४दुसरा व चौथा शनिवार आणि ज्या दिवशी पालिकेला सुट्टी असेल, अशा दिवशी कामगारांना कामावर बोलविण्यात आले नसल्यास त्याचे वेतन कापण्यात येऊ नये ४कंत्राटी कामगारांना वेतन व भत्ते रोख स्वरूपात न देता ठेकेदारांनी बँकेत खाते खोलून कर्मचाऱ्यांच्या नावाच्या धनादेशाद्वारे ही वेतनाची रक्कम जमा करावी. ४कामगारांना विशेष भत्ता, बोनस, भविष्यनिर्वाह निधी देण्यात यावा.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही आता मिळणार सुटीचा पगार
By admin | Updated: March 26, 2015 00:07 IST