निर्बंध शिथिल; गर्दीवर नियंत्रण गरजेचे
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : तब्बल दोन महिन्यांनंतर बारामतीचा कोरोना पॉझिटिव्ह रेट १० टक्क्यांच्या खाली आहे. सध्या बारामतीचा पॉझिटिव्ह रेट ६ टक्क्यांवर आहे. मात्र, संक्रमणाचा हा टक्का ५ टक्क्यांच्या खाली येणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. रुग्णसंख्या घटल्याने बारामतीकरांना निर्बंधामधून शिथिलता मिळाली असली तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन प्रशासनासमोर असणार आहे.
मार्च महिन्यापासून वाढत जाणा-या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे बारामती शहर व तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संक्रमणचा वेग मोठा असल्याने बारामतीमध्ये वैद्यकीय आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाली होती. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ३ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू केले होते. दुसऱ्या लाटेनंतर बारामतीमध्ये आतापर्यंत २५ हजार ६२ कोरोना संक्रमणाची प्रकरणे समोर आली. तर यामधील २४ हजार ४४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ६३७ रुग्णांना उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. एप्रिल व मे महिन्यामध्ये लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे मेच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वेगाने घटू लागली. सुमारे ३० टक्क्यांच्या घरात असणारा संक्रमणाचा टक्का आता ६ टक्क्यांवर आला असून मृत्यूदर देखील २ टक्क्यांवर आला आहे. तर ५८४ बेड शिल्लक आहेत. बारामतीला ६.५ टन आॅक्सिजन आवश्यकता असून सध्या ११ टन आॅक्सिजन प्राप्त झाला आहे. तर आतापर्यंत १ लाख ५ हजार १८५ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच म्युकरमायकोसिसचे २२ रुग्ण अढळून आले आहेत. यापैकी बारामतीत १५ रुग्ण अढळले आहेत. तर इतर तालुक्यातील ७ रुग्ण अढळून आले होते. सध्या म्युकरमायकोसिसचे ६ रुग्ण उपचार घेत आहेत.
------------------------
चौकट
निर्बंध शिथिल झाले असले तरी बारामतीमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण अढळून येत आहेत. भविष्यात तिसरी लाट टाळायची असेल तर कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच सध्याचा पॉझिटिव्ह रेटदेखील ५ टक्क्यांच्या खाली येणे गरजेचे आहे.
- डॉ. मनोज खोमणे
तालुका आरोग्य अधिकारी, बारामती
----------------------------
बारामतीमध्ये रुग्णसंख्या घटत असली तरी दैनंदिन ५० च्या पुढे नव्याने बाधित रुग्ण अढळून येत आहे. त्यामुळे बारामतीकरांभोवती कोरोना संक्रमणाचा विळखा अद्याप कायम आहे. रुग्णसंख्या घटू लागल्याने प्रशासनानने मंगळवार (दि.१५) पासून व्यापा-यांना सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परिणामी बारामती शहरातील रस्त्यांवर गर्दी ओसंडून वाहू लागली आहे. वाढत्या गर्दीमुळे येत्या काही दिवसात कोरोना संक्रमणाचा वेगदेखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुकाने उघडली असली तरी अनावश्यक गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
-------------------------------------
फोटो ओळी : बारामती शहरातील भिगवण चौक मंगळवारी सकाळी असा गर्दीने ओसंडून वाहत होता.
१५०६२०२१-बारामती-०२
--------------------------------