खडकी : बोर्डाने उपाध्यक्षपदासाठी नवीन गाडी घेऊ नये. त्यामुळे बोर्डाचा पैसा वाया जात आहे, अशी मागणी काँग्रेस नगरसेविका पूजा आनंद यांनी सभेत केल्याने एकच गदारोळ झाला व मंगळवारी (दि. २९) सभेत काँग्रेस सदस्यांमध्येच पुन्हा एकदा वाद उफाळून आला. खडकी बोर्डाची सभा सहा महिन्यांनंतर अध्यक्ष अनुराग भसीन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्याधिकारी अमोल जगताप व उपाध्यक्ष सुरेश कांबळे यांच्यासह सर्व सदस्य या वेळी उपस्थित होते, सहा महिन्यांनंतर झालेल्या या सभेत काँग्रेस सदस्यांच्या वादामुळेच ही सभा रंगली. तसेच, सुरुवातीलाच अपक्ष नगरसेविका वैशाली पहिलवान यांच्या अनोख्या आंदोलनामुळे सभेत एकसूत्रता आली. रेंजहिल्स भागाचे प्रश्न सुटावेत, हद्दीचा वाद मिटावा यासाठी बोर्डाने कडक पावले उचलावीत, तोपर्यंत आसनग्रहण करणार नाही, अशी अनोखी भूमिका घेतली व अध्यक्षांनी विनंती केल्यावर, आश्वासन दिल्यावरच त्यानी आसनग्रहण केले व सर्वांना अनपेक्षित धक्का दिला.बोर्डाने काही महिन्यांपूर्वी उपाध्यक्षपदासाठी नवीन गाडी घेण्याचा प्रस्ताव पारित केला होता. त्यास आक्षेप घेत आनंद यांनी ही गाडी घेऊ नये. बोर्डाचा पैसा वाया जात आहे व जाणार आहे, अशी मागणी केल्याने एकच शांतता पसरली व क्षणार्धात तणावाचे वातावरण दिसू लागले. सदस्या पहिलवान यांनी याचे पैसे दुष्काळग्रस्तांना देण्याची मागणी करताच आणखी भर पडली. उपाध्यक्ष काँग्रेसचे सुरेश कांबळे, सदस्य कमलेश चासकर, अभय सावंत, अपक्ष दुर्योधन भापकर, तसेच भाजपा सदस्या कार्तिकी हिवरकर यांनी यास विरोध दर्शविला व एकच गदारोळ झाला. या विषयामुळे विकासावरील चर्चा पुन्हा एकदा वैयक्तिक हेवेदावे व मानापमानात अधोरेखित झाली. उपाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी साधा माणूस उपाध्यक्ष झालेला काहींना पाहावत नाही. ही गाडी व्यक्तीसाठी नसून, या पदासाठी आहे. बोर्डाची प्रतिमा जपायची, की उघड्यावर टाकायची, अशा शब्दांत कांबळे यांनी रोष व्यक्त केला. (वार्ताहर)
उपाध्यक्ष गाडीवरून काँग्रेस सदस्यांत खडाजंगी
By admin | Updated: September 30, 2015 01:08 IST