पिंपरी : नोटाबंदीच्याविरोधात पिंपरी चिंचवड शहर काँगे्रसच्या वतीने सोमवारी पिंपरीत थाळीनाद आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनावेळी शहराध्यक्ष सचिन साठे, पक्षनिरीक्षक व सरचिटणीस रेणू पाटील, रूपाली कापसे, माजी महापौर कविचंद भाट, माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, सेवा दलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, एआयसीसीच्या सदस्या निगार बारस्कर, सल्लागार शामला सोनवणे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख आदी उपस्थित होते. साठे म्हणाले, की सामान्यांचे कष्टाचे पैसे बँकेत भरायला लावून भांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठी एकाधिकारशाही पद्धतीने नोटाबंदीचा निर्णय लादला आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडली. सव्वाशे लोकांना जीव गमवावा लागला. गृहिणींनी बचत केलेल्या पैशाचा हिशोब मागणारे सरकार भाजपाच्या पदाधिकारी व मंत्र्यांकडे लाखो रुपयांच्या नोटा सापडूनदेखील त्यांच्यावर कारवाई का करीत नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. शास्तीकर, अनधिकृत बांधकाम या विषयांवर साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करणारे आता कुठे गेले. निर्णय न घेता जाहिरातबाजी करून खोटा प्रचार करण्यात आला, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्याविरोधात थाळीनाद करून निषेधाच्या घोषणा दिल्या. नोटाबंदीच्या फसलेल्या निर्णयाविरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरीत आंदोलन केले. चिंचवड स्टेशन येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. तेथून मुंबई-पुणे महामार्गाने मोर्चा पिंपरीत आला. आंबेडकर पुतळा चौकात सभा झाली. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात महापौर शकुंतला धराडे, माजी आमदार विलास लांडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे, स्थायी समिती सभापती डब्बू आसवाणी, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, हनुमंत गावडे, भाऊसाहेब भोईर, जगदीश शेट्टी, अतुल शितोळे, नाना लोंढे सहभागी होते.
नोटाबंदीच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन
By admin | Updated: January 10, 2017 03:18 IST