आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून
फिरता दवाखाना शिबिराची सुरुवात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविला उपक्रम
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून मोबाईल व्हॅनचे माध्यमातून फिरता दवाखाना शिबिर सुरु करण्यात आले आहे. तालुक्यातील ५२ गावांमध्ये हे शिबिर सुरु राहणार आहे.
गुरुवारी (दि.२२) सकाळी ८.३० शासकीय महिला रुग्णालयात या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. कृषी विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते या उपक्रमाची आज सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद सभापती प्रमोद काकडे, बारामती नगरपरीषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे पंचायत समिती सभापती नीता फरांदे, उपसभापती रोहित कोकरे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, डॉ. बापू भोई, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा वनिता बनकर, शहराध्यक्षा अनिता गायकवाड, युवती अध्यक्षा आरती शेंडगे, तहसीलदार विजय पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी तालुक्यातील शिर्सुफळ, गाडीखेल येथे मोबाईल व्हॅनचे माध्यमातून फिरता दवाखाना शिबिर घेण्यात आले. २३ आॅगस्ट रोजी डोर्लेवाडी आणि सोनगाव येथे शिबिराचा समारोप होणार आहे. या शिबिराअंतर्गत मधुमेह, रक्तदाब या आजारासह संपूर्ण आरोग्याची गावोगावी जावुन तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित गावातील मध्यवर्ती ठिकाणी दररोज हा फिरता दवाखाना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांसह थांबणार आहे. ग्रामस्थांना आरोग्य समस्या आढळल्यास औषधोपचारासह मोफत औषधे दिली जाणार आहेत. शिवाय सर्व नागरिकांच्या आरोग्याची माहिती संकलीत ठेवली जाणार आहे. गंभीर आजारासाठी गरज पडल्यास पुणे शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडुन उपचार तसेच शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे. यासाठी आमदार रोहित पवार यांनी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त केल्याचे शिबीर समन्वयकांनी सांगितले.
गेल्या चार वर्षांपासुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती आणि पुरंदरमध्ये आरोग्य शिबीराचा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये २०१७ पासुन ५८ हजार ८० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ७ हजार ८०१ रुग्णांवर उपचार पुर्ण करण्यात आले. तर५७४ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्याचे समन्वयकांनी सांगितले.
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून फिरता दवाखाना शिबिराची बारामती येथे सुरुवात करण्यात आली. यावेळी कृषि विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनंदा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आणि अन्य.
२२०७२०२१ बारामती—०१