पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभाग व प्रशासकीय कार्यालयांनी चांगले काम केले आहे. देशातील एकाही विद्यापीठाकडून राबविल्या जात नाहीत, अशा योजना या विद्यापीठात राबविल्या जात आहेत. मात्र, विद्यापीठाने प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याकडे व विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक पायाभूत सुविधा वाढविण्याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला नॅक समितीच्या सदस्यांनी बुधवारी विद्यापीठाला दिला.विद्यापीठाचे मूल्यांकन करण्यासाठी २३ ते २५ जानेवारी या कालावधीत नॅक समितीने विद्यापीठाच्या विविध विभागांची व प्रशासकीय कार्यालयातून केल्या जाणाऱ्या कामाची तपासणी केली. दोन दिवस विद्यापीठातील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर समितीच्या सदस्यांनी बुधवारी विद्यापीठाचे विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी यांच्यासमोर तपासणीदरम्यान निदर्शनास आलेल्या बाबी सांगितल्या. विद्यापीठाला भेट देणाऱ्या दहा सदस्यीय समितीमध्ये ५ आजी-माजी कुलगुरू आणि ५ तज्ज्ञ प्राध्यापक होते. भेटीच्या शेवटच्या दिवशी समितीच्या सदस्यांकडून कोणत्या गोष्टी सांगितल्या जाणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. परंतु, विद्यापीठाने संशोधन क्षेत्रात प्रगती केली आहे. तसेच प्रशासकीय विभागांकडूनही माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आॅटोमेशनचे काम केले असल्याचे सांगितले.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, की नॅक समितीच्या सदस्यांनी विद्यापीठाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. विद्यापीठातर्फे केवळ शिक्षक, विद्यार्थ्यांनाच नाही, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही परदेशात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. याबाबत समितीच्या सदस्यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले. देशात इतर कुठेही अशी संधी दिली जात नसल्याचे त्यांनी नमूद केले.
नॅक समितीच्या तपासणीचे काम पूर्ण
By admin | Updated: January 26, 2017 00:53 IST