पुणे : ढोल-ताशांचा गजर, रांगोळ्यांच्या पायघड्या, आकर्षक रथ, गर्दीचा महापूर, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या निनादात दर वर्षी जल्लोषात पार पडणाऱ्या मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बेलबाग चौक, अलका चौक या मोक्याच्या ठिकाणांहून गणरायाला निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी मंडळांनी जय्यत तयारी केली.कसबा पेठकसबा गणपती विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट असलेल्या पारंपरिक पालखीत विराजमान होईल. सकाळी साडेदहा वाजता लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सुरुवात होईल. महापौर दत्तात्रय धनकवडे व पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आरती होऊन, लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीची सुरुवात होईल. या वेळी जवळकर बंधूंचे नगारावादन, ढोल-ताशा पथक आणि कामायनी संस्थेतील विद्यार्थ्यांचे पथनाट्य मिरवणुकीची शोभा वाढविणार आहे.तांबडी जोगेश्वरीतांबडी जोगेश्वरी गणपती चांदीच्या पालखीत विराजमान होऊन सहभागी होणार आहे. सतीश आढाव यांचे नगारावादन, परदेशी बंधूंचे अश्वपथक, न्यू गंधर्व बँड, कलावंत व शिवमुद्रा ढोल-ताशा पथक सहभागी असणार आहे. या वेळी मंडळाचे कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मंडळाने यंदा इतर मानाच्या गणपतींप्रमाणेच हौदात विसर्जन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गुरुजी तालीम मंडळातर्फे मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारा वादन होणार आहे. अश्वराज बँड पथक, चेतक ढोल-ताशा पथक मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहे. त्याचप्रमाणे शिवगर्जना, नादब्रम्ह या लोकप्रिय पथकांचा समावेश आहे. मिरवणुकीसाठी सुभाष सरपाले यांनी फुलांचा शिवरथ तयार केला आहे, असे प्रवीण परदेशी यांनी सांगितले. टिळक पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात होईल. मंडळातर्फे दुष्काळग्रस्तांसाठी २१,००० रुपयांची मदत करण्यात आली आहे. तुळशीबाग मित्र मंडळ सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मानाच्या चौथ्या गणपतीचा मिरवणुकीत समावेश होईल. मंडळातर्फे लोणकर बंधूंच्या नगारा वादनाने मिरवणुकीला सुरुवात केली जाईल. स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी ही पथके व हिंद तरुण मंडळांचे ढोल पथक मंडळाच्या मिरवणुकीची शोभा वाढवेल. गणेश विसर्जनासाठी आकर्षक पुष्परथ तयार करण्यात आला आहे. पांढरा कुर्ता, पायजमा, फेटे आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर असा पारंपरिक आविष्कार मिरवणुकीत पाहायला मिळेल.केसरीवाडाकेसरीवाडा गणपतीची मिरवणूक दर वर्षीप्रमाणे पारंपरिक फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथामधून निघेल. बिडवे बंधंूचे सनई-चौघडा, श्रीराम, शिवमुद्रा व शौर्य ही ढोल-ताशा पथके यामुळे केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणूक आकर्षक करणार आहे. इतिहासप्रेमी मंडळातर्फे विदेशी कपड्यांच्या होळीचा देखावा सादर केला जाणार आहे. पारंपरिक वेशभूषेतील पथक व कार्यकर्ते आकर्षणाचे केंद्रबिंदू असतील.------त्वष्टा कासार मित्र मंडळ मानाचे पाच गणपती विसर्जन झाल्यावर, या मंडळाचा गणपती सर्वप्रथम लक्ष्मी रस्त्यावर येतो. मंडळातर्फे मिरवणुकीत ‘कोकण दर्शन’ हा विषय सादर केला जाणार आहे, असे अंजलेश वडके यांनी सांगितले. कोकणातील शिमगा, होळी, गणेशोत्सव हे सण, कोकण मेवा, तेथील लोककला यावर नृत्य, नाट्याचे सादरीकरण केले जाईल. पालखी नाचवणे, ढोलीबाजा, होळीतील सोंगे, कोळींमधील विवाह पद्धत ही मिरवणुकीतील सादरीकरणाची ठळक वैशिष्ट्ये असतील. विमलाबाई गरवारे प्रशालेचे ध्वजपथक, ढोलपथक आणि वाद्यवृंद या मंडळासाठी वादन करणार आहेत. गणपतीच्या रथामागील फ्लेक्सवर कोकण रेल्वे, कोकण मेवा, गणपतीपुळे येथील मंदिर, कोकण किनारा यांचे चित्रण केले आहे. दर वर्षीप्रमाणे मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. एकता मित्र मंडळ, टिळक रस्ता मंडळातर्फे विसर्जन अगदी साध्या पद्धतीने केले जाणार आहे, असे अनिल बेनगुडे यांनी सांगितले. जलप्रदूषण टाळण्यासाठी गणपतीचे विसर्जन हौदामध्ये केले जाणार आहे. मिरवणुकीतील खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत केली जाणार आहे. अखिल मंडई मंडळ शिवरायांची रायरेश्वरावरील स्वराज्याची शपथ हा अखिल मंडई मंडळाचा खास रथ असणार आहे. यामध्ये मेघडंबरीमध्ये बसलेल्या शिवरायांसोबत गणराय विराजमान होणार आहेत. गंधर्व बँड, शिवराज व नादब्रम्ह ढोल पथक मंडईच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.बाल तरुण मंडळ रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट असलेल्या रथावर गणराय विराजमान होऊन बाल तरुण मंडळ मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहे. मंडळापुढे मुळशी तालुक्यातील ढोल पथक व बँड असणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साह्यता निधीसाठी मंडळाच्या वतीने काही रक्कम देण्यात येणार आहे.खजिना विहीर मंडळ शंख, डंमरू, डफलीसह सहा पारंपरिक वाद्य असलेल्या पथकासोबत राजहंस रथावर विराजमान होऊन खजिना विहीर मंडळाचा गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे. याशिवाय ‘मी पुणेकर’ हे खास पथकदेखील असणार आहे.ग्राहक पेठ नेहमीप्रमाणे सायंकाळी ४ वाजता टिळक रोड येथून मिरवणुकीला सुरुवात होईल. ज्ञान प्रबोधनी व ग्राहक पेठच्या महिलांचे ढोल पथक मिरवणुकीची शोभा वाढविणार असून, लोकमान्य टिळक, शिवाजी महाराज आणि अप्पा पेंडसे यांच्या प्रतिकृती मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत.--------अनेक मंडळे मिरवणुकीपासून दूरराज्यावर दुष्काळाचे सावट असताना अनेक मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत मिरवणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मिरवणुकीतील खर्च टाळून मंडळे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहेत. पुण्यातील मंडळांनी पाडलेला हा पायंडा गणेशोत्सवातील सामाजिक बांधिलकी जपणारा आहे.आझाद मित्र मंडळ : मंडळाचा गणपती यावर्षी अतिशय साध्या पद्धतीने विसर्जन केला जाणार आहे. हे मंडळ यंदा मिरवणुकीत सहभागी होणार नाही. त्याऐवजी सामान्यांच्या मदतीला धावून जाण्याचा आणि पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रसाद शितोळे यांनी सांगितले. मिरवणुकीतील खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत दिली जाईल.खालकर तालीम मंडळ : मंडळ यंदा मिरवणुकीच्या धूमधडाक्यात सहभागी होणार नसल्याचे अजय शिंदे यांनी सांगितले. मिरवणुकीतील खर्च टाळून गणपती मंदिर; तसेच इतर विधायक उपक्रम वर्षभर राबविले जाणार आहेत. काळभैरवनाथ मंडळ :मंडळातर्फे ‘नाम’ या संस्थेला आर्थिक मदत करण्यात आली आहे, असे उमेश सपकाळ यांनी सांगितले. मिरवणुकीत सहभागी होऊन पैशांची उधळपट्टी करण्याऐवजी, ते पैसे दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी वापरण्यात आले आहेत. अमरज्योत मित्र मंडळ :मंडळाने यावर्षी सामाजिक बांधिलकी जपत विसर्जन मिरवणुकीवरील खर्च टाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पैशांचा वापर करून, दुष्काळी गावातील बांधवांना मदत केली जाणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्याची किती आवश्यकता आहे, जीवन म्हणून पाणी किती महत्त्वाचे आहे, दुष्काळग्रस्त भागात पाण्याला किती महत्त्व आहे, यास अनुसरून समाज प्रबोधनासाठी हलता देखावा आहे. दुष्काळनिधी संकलित करून, तो शेतकरीबांधवांना दिला जाणार आहे. अनिल मित्र मंडळ :कुंभारवाडा येथील अनिल मित्र मंडळाने यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक रद्द केली आहे. त्या पैशांतून गरजू संस्थांना शिलाई मशिन, कपडे व धान्यवाटप करण्यात आले. यासाठी मंडळाचे अध्यक्ष सागर शिंदे, कार्याध्यक्ष विशाल शिंदे यांनी पुढाकार घेतला.
पुढच्या वर्षी लवकर या!
By admin | Updated: September 27, 2015 01:43 IST