पुणे : मार्च महिना म्हटला, की आग ओकणारा सूर्य... घामाच्या धारा... उकाडा... हेच चित्र डोळ्यांसमोर येते. मात्र यंदा ऐन मार्च महिन्यात पुण्यात थंडी पडली आहे. कमाल तापमान सरासरीपेक्षा तब्बल ७.९ अंशांनी घटून २६.२ अंशापर्यंत आणि किमान तापमान २.९ अंशांनी घटून १०.९ अंशापर्यंत खाली आले आहे. त्यामुळे पुणेकरांना मार्चमध्ये थंडीचा अनुभव येत आहे.सलग दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहराच्या तापमानात दोन दिवसांपासून सलग घट होत आहे. कालच्या तुलनेत आज आणखी घट नोंदविली गेली. पावसामुळे रात्री जाणवणारी थंडी आज दिवसाही जाणवत होती. त्यामुळे ऐन मार्चमध्ये पुणेकरांनी स्वेटर्स, जर्किन, कानटोप्या पुन्हा बाहेर काढून परिधान केल्या आहेत.शहरासह उपनगरांमध्येही अशीच स्थिती आहे. लोहगावचे कमाल तापमान सरासरीपेक्षा तब्बल ८.५ अंशांनी घटून २६.५ अंशांपर्यंत आणि किमान तापमान १२.६ अंशांपर्यंत खाली आले. पाषाणचे कमाल तापमान २७.९ अंश आणि किमान तापमान ११.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.सलग दोन दिवसांच्या पावसानंतर आज दिवसभर शहरात कडक ऊन पडले होते. त्यामुळे पुणेकरांना बरे वाटले. मात्र गार वाऱ्यामुळे दिवसाही पुणेकरांना थंडीचा फिल येत होता.पुढील २४ तास आकाश निरभ्र राहील. शहरात कमाल तापमानात थोडी वाढ होईल; मात्र किमान तापमान घटलेलेच राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
ऐन मार्चमध्ये थंडी
By admin | Updated: March 4, 2015 00:33 IST