पुणे : भारतीय जनता पक्षाचा महापालिकेतील विजय हा पक्षसंघटनेचा विजय आहे. त्यामुळे या सर्व नगरसेवकांवर जबाबदारी आहे. प्रशिक्षणातून त्यांना त्याची जाणीव करून देण्यात येईल. त्यांच्यासाठी आचारसंहिता असेल व दर तीन महिन्यांनी त्यांच्या कामाचा आढावाही घेतला जाईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. यासाठी शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र यंत्रणा असेल असे ते म्हणाले.महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या अभिनंदनासाठी विधानसभा अधिवेशनातून वेळ काढून बापट बुधवारी महापालिकेत उपस्थित राहिले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्षाच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. पक्षाचे शहराध्यक्ष गोगावले, संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले या वेळी उपस्थित होते. बापट म्हणाले, ‘‘पुणेकरांनी पक्षावर मोठ्या विश्वासाने जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे पक्षाचे सर्व नगरसेवक अत्यंत जबाबदारीने सत्तेचा वापर करतील. नगरसेवक प्रभागातील प्रश्न सोडवीत असतानाच पक्ष संघटनेचेही त्यावर लक्ष असेल. वचननाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी शहराध्यक्ष गोगावले यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र यंत्रणा असेल. तिच्याकडून नियमितपणे आढावा घेतला जाईल. जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन शहराचा विकास करण्याची पक्षाची भूमिका आहे.’’(प्रतिनिधी)
भाजपा नगरसेवकांसाठी आचारसंहिता
By admin | Updated: March 16, 2017 02:14 IST