पुणे : आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल १३ विषय हे आयत्या वेळेस आल्याने, सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.अर्थसंकल्पानंतर सहा महिने का वाया घालविले? आधी हे विषय का आले नाहीत? पंचायत राज कमिटीमुळे कामकाज बंद ठेवले होते का? असे प्रश्न उपस्थित करीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी विलंब झाला हे मान्य केले. पंचायत राज कमिटी १० वर्षांनंतर आली होती. तसेच, त्यांनी अचानक दौऱ्याचे नियोजन बदलले. याम अडीच ते तीन महिने गेले, असे स्पष्ट केले. मात्र, यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. यानंतर आर्थिक विषय ऐनवेळी घेता येतात का, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे व आशाताई बुचके यांनी उपस्थित करीत काही काळ कायद्याचा किस पाडला. त्यानंतर प्रशासनाने आर्थिक विषय ऐनवेळच्या ठरावात येत नाहीत. अपवादात्मक परिस्थितीतच ते येतात, असे स्पष्ट करीत हे ठराव सभेत घेण्यास अपात्र असल्याचे जाहीर केले. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी मध्यस्थी करीत खातेप्रमुखांना सक्त सूचना दिल्या, की यापुढे असे होता कामा नये. यापुढे परत ही चूक होणार नाही, असे आश्वासन दिले. त्यानंतर माऊली खंडागळे यांनी माझा विरोध नोंदवून मंजुरी द्या, असे सांगितले. त्यावर पेच निर्माण झाल्याने अध्यक्षांनी आतापर्यंत प्रशासनाच्या या चुका सहन करीत आलो आहोत. यानंतर असेच झाले तर मी स्वत: तुमच्या बरोबर असेल, असे आश्वासन दिल्यानंतर विषय मंजूर करण्यात आले. सदस्यांना पत्राला उत्तरे दिली जात नाही, ठेकेदारांच्या शिरकावावरही चर्चा झाली.
आयत्या वेळच्या विषयांवर गोंधळ
By admin | Updated: September 5, 2015 03:25 IST