पुणे : महापालिकेच्या विविध विभागांमध्ये किरकोळ कामांसाठी महिनोन्महिने फिरणाऱ्या फायलींचा प्रवास आता एका क्लिकवर मिळणार आहे. महापालिकेकडून नागरिकांच्या कामांसाठी तसेच शहराच्या विकासकामांसाठी तयार केल्या जाणाऱ्या प्रस्तावांच्या फायलींचे ट्रॅकिंग सुरू करण्यात आले आहे. पालिकेच्या तब्बल २0 विभागांत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, त्यात अतिरिक्त आयुक्त, भांडार विभागासह इतर प्रमुख विभागांमध्ये ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात गतिमानता येण्यासाठी महापालिकेने नागरिकांची सनद प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, कोणत्या विभागाने, कोणत्या अधिकाऱ्याने, कोणते काम किती दिवसांत पूर्ण करावे यासाठी कालमर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, त्या सनदीलाच हरताळ फासण्याचे काम अनेकदा केले जाते. त्यामुळे नागरिकांना वारंवार हेलपाटे घालावे लागतात. परिणामी काही दिवसांत होणारे काम वर्षानुवर्षे रखडते. त्यामुळे आता महापालिकेच्या फायलींची माहिती आणि नागरिकांच्या होणाऱ्या पत्रव्यवहारांची नोंद थेट संगणकावर घेऊन हे अर्ज थेट संबंधित विभागास आॅनलाइन पद्धतीने पाठविण्यात येणार आहेत. ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे, तर येत्या काही महिन्यांत महापालिकेच्या सर्व विभागांत ही प्रणाली टप्प्याटप्प्याने कार्यरत होणार आहे.
फायलीचा प्रवास कळणार क्लिकवर
By admin | Updated: April 24, 2015 03:40 IST