लोणावळा : पर्यटननगरी लोणावळा शहरात बुधवारी नागरी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्व रस्त्यांवरील कचरा, प्लॅस्टिक व रिकाम्या बाटल्या गोळा करण्यात आल्या़ जिल्हाधिकारी सौरभ राव मोहिमेत सहभागी झाले होते़शहरात देशभरातील पर्यटक येत असतात़ हे शहर स्वच्छ व सुंदर व्हावे व या माध्यमातून देशभरात स्वच्छतेचा संदेश जावा याकरिता ही मोहीम राबवली असल्याचे जिल्हाधिकारी राव यांनी सांगितले़ या मोहिमेत लोणावळा नगर परिषद, आयएनएस शिवाजी, टाटा कंपनी, टाटा प्रिव्हो, लोणावळा शहर पत्रकार संघ, आरपीटीएस खंडाळा, लोणावळा शिक्षण मंडळ, शिवदुर्ग प्रतिष्ठान, लायन्स सुप्रिमो, मावळ वार्ता, रोटरी क्लब यासह विविध शाळा व संघटना सहभागी झाल्या होत्या़ शहरात ९ ठिकाणी वेगवेगळे गट करत ही मोहीम राबविण्यात आली़जिल्हाधिकारी राव व नगराध्यक्ष अमित गवळी यांच्या हस्ते रायवूड विभागातील आॅक्झिलियम कॉन्व्हेंट शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले़ या वेळी राव यांनी रायवूड उद्यान ते भुशी धरण परिसरातील रस्त्यांची पाहणी केली़ या वेळी त्यांच्या समवेत आयएनएस शिवाजीचे कमांडर, तहसीलदार शरद पाटील, पोलीस निरीक्षक आय़एस़पाटील, नगराध्यक्ष अमित गवळी, उपनगराध्यक्ष भरत हारपुडे, मुख्याधिकारी गणेश शेटे, उपमुख्याधिकारी शिवाजी मेमाणे, शिक्षण मंडळ सभापती जितेंद्र टेलर, पत्रकार संघ अध्यक्ष निखिल कविश्वर यांच्यासह नगरसेवक व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते़ (वार्ताहर)
लोणावळ्यात स्वच्छता अभियान
By admin | Updated: June 17, 2015 23:24 IST