नारायणगाव : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक मताने विजयी झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार शरद लेंडे यांच्या विरोधात पराभूत शिवसेनेचे उमेदवार मंगेश काकडे यांनी सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे, अशी माहिती काकडे यांचे वकील अॅड. योगेश जाधव यांनी दिली़ दरम्यान, न्यायालयाने दि़ २१ मार्च २०१७ ही तारीख दिली असून, या तारखेला निवडणूक निर्णय अधिकारी काय भूमिका मांडणार व कोर्ट पुढे काय निर्णय देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़ अॅड. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीत आळे-पिंपळवंडी गटातील निवडणूक अटीतटीची झाली होती़ या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मंगेश काकडे हे एक मताने पराभूत झाले होते़ या निर्णयप्रक्रियेत खेड येथील सत्र न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. काकडे यांच्या वतीने पोस्टल बॅलेट मतदानावर हरकत घेण्यात आली आहे़ मतमोजणीच्या वेळी हरकत फेटाळून राष्ट्रवादीचे उमेदवार शरद लेंडे यांना एक मताने विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे़ निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पोस्टल मतदान बाद करणे अपेक्षित असताना ते बाद न करता ग्राह्य धरल्याने पिटीशन दाखल करण्यात आले आहे़ इलेक्शन कमिटीच्या नियमानुसार पोस्टल बॅलेट वोटमध्ये फरक दिसून येत आहे. काही मतपत्रिकांवर स्टॅम्प नाही, आयडीएनटी कार्ड घेण्यात आलेले नाही, काही मतपत्रिकांवर शिक्के, सह्या नाहीत़ मतदान अनुक्रमांक चुकीच्या पद्धतीने आहे़ त्या मतपत्रिका बाद धरण्यात याव्यात, अशा स्वरूपाचे इलेक्शन पिटीशन कोर्टात दाखल करण्यात आले आहे़ न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी दि. २१ मार्च २०१७ ही तारीख दिलेली आहे.
एक मताने विजयी शरद लेंडेंच्या विरोधात दावा
By admin | Updated: March 12, 2017 03:15 IST