लोकमत न्यूज नेटवर्कवाघोली : चुकीच्या पद्धतीने घेतलेले रीडिंग व खराब मीटरमुळे महावितरण कडून पाच ते दहापट वाढीव वीजबिले येण्याचे प्रकार वाघोलीतील सोसायटीधारकांसोबत घडत आहे. साई संस्कृती सोसायटीतील एका घरगुती ग्राहकाला सरासरी ४०० रुपये वीजबिल येत असताना मागील महिन्याचे ९६ हजार रुपये आले असल्याने सोसायटीधारक महावितरणच्या कारभारामुळे हैराण झाले आहेत.वाघोलीतील अनेक सोसायट्यांमध्ये नागरिक सध्या महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र वाघोली मध्ये पाहावयास मिळत आहे. महावितरणकडून देण्यात आलेले खराब मीटर व चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या रीडिंगमुळे चालू महिन्यामध्ये सोसायटीतील नागरिकांना दुप्पट, तिप्पट नव्हे तर पाच ते दहापट वाढीव वीजबिले येत आहेत. याचा सर्वाधिक फटका बाइफ रस्त्यालगत असणाऱ्या साई संस्कृती सोसायटीला बसला आहे. सोसायटीतील ५०हून अधिक ग्राहकांना वाढीव बिले आली आहेत. यामध्ये सुबोध तारळ या ग्राहकाला महिन्याला सरासरी २०० ते ४०० रुपये वीजबिल येत असताना या महिन्यामध्ये ९४ हजार ९९० रुपये बिल आले आहे. त्याचबरोबर इतर घरगुती ग्राहकांनाही ७० हजार, ५५ हजार, २७ हजार अशी वीजबिले आली आहेत. यामुळे ग्राहकांनी शनिवारी भावडी रोड येथील महावितरण कार्यालयावर तक्रारींचा पाढा वाचला. या वेळी आणखी ५ ते ६ सोसायटीतील नागरिक वाढीव वीजबिलाच्या तक्रारी घेऊन आले होते. महावितरणतर्फे मीटर तपासून वाढीव वीजबिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे सांगण्यात आले. रविवारी कनिष्ठ अभियंता एन. वैरागर यांनी साई संस्कृती सोसायटीमध्ये जाऊन नागरिकांच्या तक्रारी समजावून घेतल्या व वाढीव वीजबिल कमी करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. महावितरणच्या या अशा कारभारामुळे सर्व कामे सोडून महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने सोसायटीधारक हैराण झाले आहेत. मीटर रीडिंग घेताना चुकत असल्यास संबंधितावर कारवाई करावी व खराब मीटर बदलून मिळावेत अशी मागणी सोसायटीधारक करीत आहे.कार्यालय विभाजनाची प्रतीक्षाचवाघोली शाखा कार्यालयाचे विभाजन करून वाघोली शाखा १, वाघोली शाखा २, वाघोली ग्रामीण असे विभाजन करण्याचे मागील दोन वर्षांपासून प्रस्तावित आहे. ४० हजार ग्राहक संख्या असलेल्या वाघोली शाखेमध्ये कर्मचारी कमी असल्याने अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तर अधिकारी व कर्मचारी वर्गाला ग्राहकांच्या तक्रारींना तोंड देताना चांगलीच दमछाक होत आहे. विभाजन प्रस्ताव रखडल्याने वाघोली कार्यालय विभाजनाची प्रतीक्षाच नागरिकांना करावी लागत आहे.वाघोलीतील सोसायटीधारकांना वाढीव वीजबिले येण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. महावितरणने याकडे लक्ष देऊन सुधारणा करावी अन्यथा वरिष्ठ कार्यालयामध्ये सोसायटीधारक ठिय्या आंदोलन करतील.- आशिष गलांडे, सोसायटीधारक
वाढीव वीज बिलांमुळे नागरिक हैराण
By admin | Updated: July 3, 2017 03:24 IST