पुणे : उरुळी देवाची येथील कचराडेपोच्या प्रश्नावरून फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी सशर्त मागे घेतले आहे. त्यानंतर युद्धपातळीवर गेल्या २४ तासांत तब्बल १७०० टन कचरा पालिकेकडून आज उचलण्यात आला, त्यामुळे पुणेकरांना थोड्या प्रमाणात का होईना मोकळेढाकळे वाटले. मात्र, आणखी तेवढाच कचरा शहरात पडून असून, प्रामुख्याने शहरातील मध्यवर्ती पेठा, टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालय तसेच ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत हा कचरा पडून असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. हा कचरा उचलण्यास आणखी दोन दिवस लागणार आहेत. ग्रामस्थांनी कचरा डेपोविरोधात ६ आॅगस्टपासून बेमुदत आंदोलन पुकारले होते. मात्र, त्यानंतर ३१ आॅगस्टपर्यंत या डेपोवर येणारा सर्व कचरा बंद करावा, या अटीवर हे आंदोलन ग्रामस्थांनी मागे घेतले आहे. त्यामुळे शहरातील कचराकोंडी सुटली असली, तरी गेल्या पाच दिवसांपासून शहरात जवळपास चार ते पाच हजार टन कचरा पडून होता. हे आंदोलन मागे घेताच सोमवारी मध्यरात्रीपासूनच पालिकेने शहरातील कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. यामधील सुमारे ६०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली असून, उर्वरित कचरा उरुळी देवाची येथील डेपोमध्ये कॅपिंगसाठी पाठविण्यात आला असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले. तर हंजर प्रकल्पाच्या बाहेरील बाजूसही सुमारे १७00 टन कचरा पडून असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
शहराने घेतला मोकळा श्वास
By admin | Updated: August 13, 2014 04:23 IST