शैलेश काटे, इंदापूरपरिस्थितीचे कोयते बालमनाच्या वाढ्यावर बसू नयेत... रसही नाही अन् चोयट्याही नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होऊन पुढच्या पिढ्यांचं आयुष्य तरी बैलगाड्यांच्या चाकाखाली फरफटू नये... मुलांना आतूनच शिक्षणाची ‘गोडी’ लागावी, अशी उपाययोजना शासनाने करावी, अशी ऊसतोड कामगारांची सामूहिक अपेक्षा आहे. मात्र, ५ वर्षांपासून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या साखरशाळाच बंद पडल्या आहेत. साखर शाळांच्या प्रश्नांसंदर्भात कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याकडे ऊसतोडीसाठी येणाऱ्या कर्मचारांची जेव्हा भेट घेतली. त्यावेळी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी वरील अपेक्षा व्यक्त केली. वास्तविक पाहता, गेल्या अनेक वर्षांपासून जनार्थ ही सेवाभावी संस्था या मुलांसाठी साखरशाळा चालवित होती. चार-पाच वर्षांपासून त्या शाळा बंद झाल्या आहेत. आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना सामावून घेतले जात आहे. जुलै ते आॅक्टोंबर या कालावधीत गावाकडच्या शाळांमध्ये शिकणारी ही मुले नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत कारखान्याच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. कर्मयोगी सहकारीने जिल्हा परिषद शाळेला इमारत नसताना, शाळेसाठी पक्क्या पाच ते सहा खोल्या बांधल्या. नंतर जिल्हा परिषद शाळेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून इमारत बांधून घेतली. रिकाम्या झालेल्या आधीच्या शाळा खोल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शाळेसाठी वापरात आणल्या जात आहेत, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक अनंतराव निकम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दोनशे मुले येत असताना केवळ ४५ ते ५० मुलेचं शाळेत दाखल होतात. त्यामुळे या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी. गाडीच्या चाकामागे त्यांच्या भवितव्याची फरफट होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुलांचे भविष्य बैलगाडीच्या चाकाखाली फरफटू नये!
By admin | Updated: November 5, 2014 23:25 IST