वाकड : अनेक महिन्यांपासून काळाखडक झोपडवासीयावर दहशत गाजविणार्या डुकरीणीने आज येथील वैभव अनिल आल्हाट (रा. बालाजी कॉलेजशेजारी, काळाखडक) या चार वर्षांच्या बालकावर हल्ला चढवीत त्याला गंभीर जखमी केले. काही लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्याने बालक बचावले. याबाबत माहिती अशी - वैभवच्या घरामागे डेअरी फार्मचे विशाल मैदान आहे. येथील रहिवासी येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्याने तेथे दुर्गंधी असते. पाळलेल्या सुमारे तीस डुकरांची मोठी टोळीच तेथे भटकत असते. येथून येणार्या-जाणार्यांवर वारंवार हल्ला करून या टोळीने चांगलीच दहशत निर्माण केली आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास वैभव शौचास गेला. त्याच्या मागे सुमारे २५ फूट अंतरावर तीन वर्षीय, अडीच फूट उंचीची, सुमारे ७० किलो वजनाची व्यालेली डुकरीण पिलांसह चरत होती. तिने अचानक वैभववर हल्ला चढविला. आपल्या धारदार दातांनी त्याला त्या घाणीत घोळसविणे सुरू केले. त्या चिमुरड्याला आपल्या तोंड आणि दाताच्या साहाय्याने ठुशी देत आपल्या टोळीत घेऊन निघाली होती. मात्र सुदैवाने येथे असलेल्या काही तरुणांच्या लक्षात हा प्रकार आला. मोठमोठ्याने रडणार्या वैभवला पाहून हातात दगड घेऊन धाव घेत त्यांनी डुकरीणीला हुसकावून लावले अन् जखमी वैभवला वाचवले. ती डुकरीण हुसकावून लावणार्या दहा जणांनाही न जुमानता त्यांच्यावरही ती गुरकावत होती. मात्र जमा झालेल्या लोकांच्या गर्दीमुळे तिने पळ काढला. वारंवार हल्ला करणार्या, महिलांचा आणि लहान मुलांचा पाठलाग करणार्या या डुकरांचा महापालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर गंगावणे, सुनील भोसले आणि रहिवाशांनी केली आहे. (वार्ताहर)
डुकराच्या हल्ल्यात बालक जखमी
By admin | Updated: May 30, 2014 05:07 IST