पुणे : बालकलाकार, युवक, युवतींना स्वत:मधील सुप्त गुणांचा आविष्कार सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने लातूरची अष्टविनायक संस्था व ‘लोकमत’च्या सहयोगाने शनिवारपासून अष्टविनायक राज्यस्तरीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी झालेल्या शास्त्रीय नृत्यस्पर्धेत चेन्नईच्या मुलींनी बाजी मारली आहे. ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे, सुचिता भिडे-चापेकर, माधुरी देशमुख, अष्टविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप राठी, यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी डॉ. राम बोरगावकर, विनोद निकम, अस्मिता ठाकूर, शशिकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. बक्षीस समारंभाच्या वेळी उपमहापौर आबा बागुल, सिद्धिविनायक ग्रुपचे अध्यक्ष राजेश साकला, प्रवीण मसालेचे आनंद चोरडिया उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, बारामती, बीड, लातूर तसेच इंदूर, म्हैसूर व चेन्नई येथून एकूण ४0 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. शास्त्रीय नृत्यस्पर्धेत प्रथम क्रमांक चेन्नईच्या सुकन्या कुमार, द्वितीय क्रमांक पुण्याच्या यशोदा पाटणकर यांनी तर तृतीय क्रमांक नाशिकच्या अवनी गद्रे यांनी मिळविला. पुण्याच्या अनुजा क्षीरसागर व म्हैसूरच्या मधुरा दिवानमल यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकाविली. (प्रतिनिधी)