भिगवण : नाकाबंदीदरम्यान भिगवण परिसरात एका दुचाकी चोराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. सापडलेल्या चोरट्याकडून भिगवण परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक नीलकंठ राठोड यांनी व्यक्त केली. या कारवाईत पोलिसांनी विशाल सुनील कोकरे (वय २२, रा. मदनवाडी) यास ताब्यात घेत ९० हजार रुपये किमतीच्या ३ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. कोकरे याचा एक साथीदार राहुल सुरेश सपताळे (रा. भिगवण) हा फरारी झाला आहे. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण-राशीन रोडवर नाकाबंदी करीत असताना दि. १२ रोजी मध्यरात्रीच्या वेळी एक मोटारसायकलस्वार नाकाबंदी ठिकाणी न थांबता वेगाने निघून गेला. यावेळी पोलीस शिपाई बापू हडागळे यांनी तातडीने त्याचा पाठलाग सुरू केला. यावेळी हडागळे यांनी एक पोलीस मित्र सोबत घेऊन याची माहिती पोलीस ठाण्याला दिली. लागलीच भिगवण पोलीस ठाण्याकडून पेट्रोलिंग वाहनातून या मोटार सायकलचा पाठलाग करण्यात आला. पोलीस आपला पाठलाग करीत असल्याचे लक्षात आल्याने या चोरट्याने पुणे-सोलापूर हायवेवरून पुण्याच्या बाजूला मल्लिनाथ आश्रमाशेजारी मोटारसायकल टाकून पळ काढला, तरीही पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत पकडण्यात यश मिळविले. सदर कारवाईत भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी राठोड यांच्या सोबत पोलीस बापू हडागळे, श्रीरंग शिंदे, गोरख पवार, रमेश भोसले, मुस्तकीन शेख, इन्कलाब पठाण, केशव चौधर, किरण कदम यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)
पाठलाग करून दुचाकी चोराला पकडले
By admin | Updated: October 15, 2016 06:03 IST