पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी मेघराज राऊत (सध्या रा. इस्कॉन मंदिराशेजारी, बारामती, मूळ रा. माळेगल्ली, कर्जत, जि. नगर) या विवाहितेने याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार, पती मेघराज रामदास राऊत, दीर युवराज रामदास राऊत, सासरे रामदास शिवाजी राऊत, सासू मंदा रामदास राऊत (सर्व रा. कर्जत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ९ डिसेंबर २०२० रोजी फिर्यादीचा मेघराज यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर पूजेच्या वेळीच गाडी भाड्यापोटी पतीकडून चार हजार रुपयांची मागणी करण्यात आली. फिर्यादीने आईकडून पैसे घेऊन ते दिले. त्यानंतर २५ डिसेंबर रोजी फिर्यादीला किडनी स्टोनचा त्रास होत असल्याने तिने दवाखान्यात न्या अशी विनवणी सासरकडील मंडळींना केली. परंतु त्यांनी उपाशीपोटी ठेवून तिचा छळ केला. पैशाची मागणी वारंवार होऊ लागली. त्यामुळे फिर्यादीने आईकडून पुन्हा पाच हजार रुपये घेत त्यांना दिले. त्यानंतर हे कुटुंब बारामतीत राहण्यास आले. तेथेही चार लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या कारणावरून वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी करणे, उपाशीपोटी ठेवत पतीकडून मारहाण करत हाकलून देण्यात आले.
२ जून रोजी त्यांनी भिंतीला डोके आपटून तिला मारहाण केली. त्यानंतर तिला उपचारासाठी नेले. घडल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. २१ जून रोजी तू माहेरहून पैसे आण, मला व्यवसाय करायचा आहे, असे पती म्हणाला. पैसे आणल्याशिवाय नांदवणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.