लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचे विमा दावे फेटाळणाऱ्या कंपन्या बदलाव्यात या राज्य सरकारच्या मागणीला केंद्र सरकारने नकार दिला आहे. त्यातूनच या कंपन्यांना केंद्र सरकारची फूस असल्याचे दिसत असल्याची टीका भारतीय किसान काँग्रेसने केली.
एकट्या महाराष्ट्रातून या कंपन्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतून ८ हजार कोटी रुपयांचा फायदा कमवला आहे व त्याचवेळी राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे विमा दावे फेटाळून लावले आहेत, अशी टीका किसान काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष हनुमंत पवार यांनी केली.
राज्य सरकारने त्यामुळेच या कंपन्या बदलाव्यात, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र दिले. तरीही त्याची दखल घेतली गेली नाही. केंद्र सरकार या कंपन्यांना घाबरते आहे का, असा प्रश्न पवार यांनी केला.
राज्यातील सरकारवर सदा तोंडसुख घेणाऱ्या भाजप नेत्यांनी यावर तोंड उघडावे, असा सल्लाही पवार यांंनी दिला. नफेखोर कंपन्यांना पाठीशी घालणाऱ्या केंद्र सरकारचा महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येत आहे, असे पवार म्हणाले.