पुणे : प्रत्येक सणामागे रुपक दडलेले असते. गुढीपाडव्यासोबतच वसंत ॠतूचे आगमन होत असते. त्यामुळे एकीकडे निसर्गाचा वसंत आणि उत्सवातून पुस्तकरुपी शब्दांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा वसंत बहरायला हवा. यातूनच विचारांची देवाण-घेवाण आणि संस्कृती टिकू शकेल, असे मत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. मैत्र-युवा फाउंडेशनतर्फे गुढीपाडव्यानिमित्त पुस्तक दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ लेखिका वीणा देव, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस, ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी, नीलिमा गुंडी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलम जाधव, स्मिता जाधव, स्काऊट-गाईड संस्थेचे जिल्हा मुख्य आयुक्त सुधाकर तांबे, फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांमधील वंचित मुलांनी दिंडीत सहभाग घेतला. ‘गुढी साहित्याची, गुढी मांगल्याची, गुढी संस्काराची’ असे म्हणत तरुणाईने पर्यावरण आणि स्वच्छतेचा संदेश दिला. बाजीराव रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहापासून दिंडीला सुरुवात झाली; तर दिंडीचा समारोप महाराणा प्रताप उद्यानाजवळ झाला. नीलेश पाठक, ममता जोशी, अवंती कुलकर्णी, रोशनी यादव, निधी मोटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. (प्रतिनिधी)समाजापासून दुरावलेल्या चिमुकल्यांसाठी अशा प्रकारचे सण साजरे करुन त्यांना आनंद देण्याचा आमचा प्रयत्न असतो. पाडव्यानिमित्त दागिन्यांची विक्री करुन त्यातून आलेल्या पैशांचा उपयोग वंचित मुलींच्या शिक्षणासाठी करण्याचा संस्थेचा मानस आहे.- संकेत देशपांडे (अध्यक्ष, मैत्र-युवा फाऊंडेशन)
उत्सव हे ऐक्याचे बोधक
By admin | Updated: March 22, 2015 00:54 IST