पुणे : पुण्यासारख्या पुढारलेल्या शहरातही अंधश्रद्धेचे धक्कादायक प्रकार घडत असून, जळत्या चितेमध्ये उतारे, तसेच जिवंत कोंबड्या टाकण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे नातेवाइकांच्या भावना दुखावत आहेत. पोलिसांच्या सूचनेनुसार, यावर उपाययोजनेसाठी महापालिकेकडून वैकुंठ स्मशानभूमीत तातडीने ३६ सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या महिनाभरात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.वैकुंठ स्मशानभूमी ही शहरातील सर्वांत मोठी स्मशानभूमी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्येक आमवस्या आणि पौर्णिमेला मध्यरात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत अंत्यविधी झाल्यानंतर जळणाऱ्या पार्थिवांवर टाचण्या टोचलेली लिंबे, काळया- बाहुल्या, तसेच उतारे टाकण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाही धस्तावले असून, याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. ज्या पार्थिवांवर हे उतारे टाकले जात आहेत, त्यांचे नातेवाईकही संतप्त होत असून, त्यांना उत्तरे देताना, महापालिकेच्या अधिकाऱ्यांची, तसेच वैकुंठ स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यामुळे अनेकदा वादाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागल्याने महापालिकेने आता या सर्व परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ३६ सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. एस.टी. परदेशी यांनी ‘लोकमत’ला बोलताना सांगितले. अवघे सहा सुरक्षारक्षक : शहरातील सर्वांत मोठ्या असलेल्या या स्मशानभूमीच्या सुरक्षेसाठी पालिकेकडे अवघे सहा सुरक्षारक्षक आहेत. हे सुरक्षारक्षकही ठेकेदारांकडून नेमण्यात आलेले आहेत. या स्मशानभूमीला चार गेट असून, त्यातील तीन चोवीस तास सुरू असतात, तर हे सुरक्षारक्षकही प्रत्येक आठ तासांसाठी दोन या प्रमाणे नेमण्यात आलेले आहेत. या पूर्वीही स्मशानभूमीत चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, त्यानंतरही या ठिकाणच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत विशेष खबरदारी घेण्यात आलेली नव्हती. गेल्या दोन महिन्यांपासून हे प्रकार घडत असल्याने अनेक नातेवाइकांनी महापालिकेकडे याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्याची गंभीर दखल घेत या ठिकाणच्या सुरक्षेबाबत सुरक्षा विभागास पत्र देण्यात आले असून, पोलिसांमध्येही तक्रार देण्यात आलेली आहे. तसेच असे प्रकार घडू नयेत म्हणून वैकुंठ स्मशानभूमीमधील सर्व कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.- डॉ. एस. टी. परदेशी(आरोग्यप्रमुख) हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यावर तातडीने उपाय-योजना करणे गरजेचे आहे. या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. तसेच महापालिकेने असे प्रकार घडणार नाहीत. यासाठी खबरदारी घेऊन या प्रकारांना आळा घालणे आवश्यक आहे.- श्रीपाल ललवाणी (अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे शहर कार्याध्यक्ष)
वैकुंठातील अंधश्रद्धेवर सीसीटीव्हीचा उतारा
By admin | Updated: June 19, 2015 01:22 IST