पुणे : खरेदी विक्री व्यवहार मिटवून ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी लष्कर पोलिसांनी सागर सूर्यवंशी याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सागर सूर्यवंशी, अशरफ मर्चंट ऊर्फ अशरफ मेहबुब खान आणि एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी मनिष हरिष मिलानी (वय ४१, रा. सिल्व्हर वुडस, मुंढवा) यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना कोहीनूर डायमंड शॉपसमोर २० नाेव्हेंबर २०२० मध्ये रात्री दहा वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा मिलानी यांचा जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची गजानन डेव्हलपर या नावाने कंपनी आहे. सागर सूर्यवंशी हा पूर्वी मिलानी यांचा कायदेशीर सल्लागार होता. त्यांच्यात काही व्यवहारात वाद झाला. सागर सूर्यवंशी याच्या यापूर्वी फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. मनिष मिलानी व त्यांचे ओळखीचे आश्विन काम हे २० नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता घरी जाण्यासाठी गाडीजवळ आले असताना अशरफ हा तेथे आला. त्याने फिर्यादी यांची गचांडी पकडून आम्हाला सागर भाईने बातचित करण्यासाठी पाठवले आहे. तू सागरभाईला वारंवार नडू नको. त्याच्याविरुद्ध जे काही आहे, ते मिटवून टाक, नाही तर जीव गमावशील, अशी धमकी दिली. त्यावर मनिष यांनी काय मिटवायचे असे विचारले. त्यावर अशरफ याने शिवीगाळ करुन ५० कोटी देऊन टाक. एका महिलेकडे बोट दाखवून नाही तर तुझ्यावर बलात्कारची तक्रार देईन, अशी धमकी दिली. ५० कोटी रुपये देणे होत नसेल तर लोहगाव येथील जमिनीचा हिस्सा दे, असे म्हणून मनीष यांना जोरात ढकलून देऊन धारदार हत्यार दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर मनीष यांनी त्यांचे वडिल आणि वकील यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर आता तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक राऊत अधिक तपास करीत आहेत.