चाकण : खालुंब्रे येथील दीड महिन्याच्या बाळाचा विहिरीत फेकून खून केल्याप्रकरणी फिर्यादीच खुनी असल्याचे अखेर निष्पन्न झाले. चाकण पोलीस ठाण्यात बाळाच्या आईवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. या घटनेचे सर्वप्रथम वृत्त देऊन या घटनेचा पहिल्या दिवसापासून ‘लोकमत’ने पाठपुरावा केला. या प्रकरणी मृत बाळाची आई अश्विनी अजित बोत्रे (वय २०) हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २१ जून २०१६ रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास भावकीच्या जमिनीच्या वादातून दीड महिन्याच्या मुलाला विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना खालुंब्रे (ता. खेड) येथे वाघेश्वर वस्तीवर घडली. या घटनेत दर्शन अजित ऊर्फ राजू बोत्रे या चिमुकल्याचा बडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी अजितचा चुलतभाऊ शिवाजी नामदेव बोत्रे ( वय ३५, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे) यास अटक करण्यात आली. त्यानंतर २३ जून रोजी खुनाची खोटी फिर्याद दिल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी हनुमान मंदिरात बैठक घेतली. ‘लोकमत’ने या घटनेचा पहिल्या दिवसापासून पाठपुरावा केला. २४ जून रोजी ग्रामस्थांनी गावात कडकडीत बंद पाळून या घटनेच्या निषेधार्थ गावात निषेध फेरी काढली व ग्रामस्थांनी हे प्रकरण खोटे असल्याने बाळाचे आई, वडील व आरोपीची नार्को टेस्टची मागणी केली. २८ जूनला आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली. २९ जूनला पोलिसांनी न्यायालयाकडे नार्को टेस्टची मागणी केली असता, न्यायालयाने नार्को टेस्ट करण्यास परवानगी दिली. नार्को टेस्टमुळे खरा प्रकार उघड होणार, या भीतीने फिर्यादीने पोलीस तपासात गुन्हा कबूल केला. २ जुलै रोजी खेड न्यायालयासमोर फिर्यादी महिलेचा कबुली जबाब नोंदविला व चाकण पोलीस ठाण्यात फियार्दीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की खोटी फिर्याद दिल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आंदोलन छेडले, याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठविला व नार्को टेस्टची मागणी करण्यात आल्यामुळे आपले पितळ उघडे पडणार, यामुळे फिर्यादीने आपण केलेल्या कृत्याचा पाढा वाचला. पोलीस रिपोर्ट दिल्यानंतर ४ दिवसांनी शिवाजीची मुक्तता होणार आहे.
बाळाच्या खूनप्रकरणी आईवर गुन्हा दाखल
By admin | Updated: July 3, 2016 03:47 IST