पुणे : कार्डियाक स्टेंटच्या किमतीत लक्षणीय घट झाली असून आता हृदयरोगावरील उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. हृदयरोगाने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे. अन्न, औषध व प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून आता स्टेंटचा अंतर्भाव अत्यावश्यक औषध सूचीमध्ये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.कार्डियाक स्टेंटची किंमत अवाजवी दरात आकारली जात असल्याचे आढळून आल्यावर अन्न, औषध प्रशासनाने याविषयी सखोल अभ्यास केला. स्टेंटच्या किमतीवर कोणतेही नियंत्रण नसल्याने उत्पादन अथवा आयात किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त दरात हे उपचार सुरू असल्याचे प्रशासनाच्या या वेळी निर्देशनास आले, त्यानंतर मंत्री बापट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष अहवाल प्रशासनाने तयार केला. अन्न, औषध व प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हा अहवाल केंद्र शासनाच्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अॅथॉरिटीकडे सुपूर्त केला. यासंदर्भात आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून व पत्रव्यवहाराद्वारे मंत्री गिरीश बापट यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि स्टेंटच्या किमती कमी झाल्या.बापट म्हणाले, ‘‘या निर्णयामुळे कार्डियाक स्टेंटच्या उपचार पद्धतीचा लाभ आता गरजूंना घेता येईल. देशातील हृदयरोगाने त्रस्त असणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. पर्यायाने, रुग्णाची सुमारे एक हजार कोटी रुपयांची बचत होईल.
हृदयरोगावरील उपचार आवाक्यात
By admin | Updated: February 16, 2017 03:21 IST