माळेगाव : माळेगावमध्ये असाध्य व घातक अशा ‘ब्रुशल्ला अॅबॉर्ट्स’ रोगाची लागण गार्इंना झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. हा रोग प्रामुख्याने गार्इंमध्ये आढळून येतो; परंतु वेळीच उपाययोजना न केल्यास तो माणसालाही होण्याचा धोका असल्याची माहिती माळेगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास गाडे यांनी दिली. गाडे यांनी सांगितले, की माळेगाव परिसरामध्ये ३ गार्इंना या रोगाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. माळेगावमधील शेतकरी शशिकांत तावरे यांच्या गोठ्यातील गार्इंचे वारंवार गर्भपात होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर १० गार्इंच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्राथमिक स्तरावर १० गार्इंपैकी ३ गार्इंना ‘ब्रुशल्ला अॅबॉर्ट्स’ या घातक रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रोगामध्ये गार्इंचा गर्भपात गर्भाच्या शेवटच्या टप्प्यावर होतो. या रोगावर वेळीच उपाय न केल्यास हा रोग पीडित गाईच्या दुधामधून व तिच्या संपर्कात आल्याने माणसालाही होण्याचा धोका असतो.क्वचितच आढळणारा हा एक महाभयानक रोग आहे. या रोगापासून आपल्या जनावरांचा बचाव करण्याकरिता ‘ब्रुशल्ला कॉटन १९ स्ट्रेन’ नावाची लस उपल्ब्ध आहे. परंतु, ही लस लहानपणी शून्य ते एक वर्ष वयामध्ये वासरांनाच द्यावी लागते. हा रोग लागण झाल्यास दीर्घ काळ इलाज करूनही बरा करता येत नाही. या रोगामध्ये गुडघे सुजणे, ताप कमी-जास्त होत राहणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. (वार्ताहर)
माळेगावात गार्इंना घातक रोगाची लागण
By admin | Updated: September 20, 2015 00:10 IST