पुणे : कर्वे रस्त्यावरील पौड उड्डाण पुलाजवळ पीएमपी बस अचानक बंद पडल्याने मागून जाणारी अवजड वाहने जागीच थांबून आज दुपारी वाहतूक अर्धा तास मंदगतीने सुरू राहिली. वाहतूक पोलिसांनी तातडीने चौकाचौकांत धाव घेऊन वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रयत्न केले. पौड उड्डाण पुलाजवळील स्टेट बॅँकेजवळ बस रस्त्यामध्येच बंद पडल्याने कोथरूड, पौडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना अडथळा निर्माण झाला. नागरिक व पोलिसांनी ही बस ढकलण्याचा प्रयत्न केला; मात्र चाके हालत नव्हती. पोलीस निरीक्षक एस. पी. पंदरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी क्रेन बोलावून बस रस्त्यातून बाजूला केली. तोपर्यंत लागलेल्या वेळात जास्त संख्येने वाहने थांबून राहून मंदगतीने पुढे सरकत होती. दुपारी दीड ते दोनपर्यंत बसने चक्का जाम केल्याने मागे गरवारे महाविद्यालयापर्यंत थांबून राहिलेल्या अवजड वाहने व मोटारींच्या कोंडीतून दुचाकीस्वार, रिक्षांना व अन्य वाहनांना वाट काढावी लागली. कर्वे रस्त्याच्या पलीकडील छोट्या रस्त्यांवर हे दुचाकीस्वार जाऊन तेथील वाहतुकीवरही ताण आला. या दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी ७ ते ८ पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गरवारे महाविद्यालयाजवळ, नळस्टॉप अशा चौकात कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रण केले.
कर्वे रस्त्यावर वाहतूककोंडी
By admin | Updated: August 18, 2015 03:56 IST