इंदापूर : तालुक्यातील कौठळी गावाजवळच्या काळ्या मातीच्या भराव्याची माती झाडांच्या मुळ्यांमुळे, उंदीर घुशींच्या बिळांमुळे भुसभुशीत झाल्याने तरंगवाडी तलावाकडे सोडलेल्या पाण्याचा वेग न आवरल्याने भराव फुटला. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी वेळीच जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने भराव्याची दुरुस्ती केल्याने मोठी पाणीगळती टळली. खडकवासला कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी तरंगवाडी तलावात साठविण्यात येत आहे. सकाळी साडेसात वाजता कौठळीनजीकच्या किलोमीटर १९६/७२० वरील काळ्या मातीच्या भराव्याच्या बाजूस वरील कारणांमुळे पाणीगळती झाली. खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापन इंदापूर उपविभागाचे उपविभागीय अभियंता के. के. देवकाते त्या वेळी नजीक किलोमीटर २०२ वर होते. पाणीगळतीची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. तातडीने दोन जेसीबी व चार ट्रॅक्टर मागवून, त्यांनी दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली. दीड तासात दुरुस्ती झाली. मात्र तोपर्यंत सुमारे ५ते ६ क्युसेक्स पाणी वाहिले होते. हे पाणी बिजवडी गावच्या पाणीपुरवठ्याच्या तलावाकडे गेले. ते वाया गेले नाही, असा दावा देवकाते यांनी पत्रकारांशी बोलताना केला. (वार्ताहर)
कालव्याचा भराव फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 01:00 IST