निमोणे : चिंचणी (ता. शिरूर) परिसरामध्ये बिबट्याच्या वास्तव्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या घबराटीमुळे अखेर वनविभागाने या भागात पिंजरा लावला आहे.चिंचणी (ता.शिरुर) परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे. अनेक शेतकऱ्यांना त्याचे वेळोवेळी दर्शन झाले होते. बिबट्याच्या या वास्तव्यामुळे परिसरामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी जाणारे शेतकरी, महिला व मजूरवर्ग यांच्यामध्ये दहशतीचे मोठे वातावरण आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी शेतकरी बापू पवार यांच्या उसाच्या शेतात बिबट्याचे पिल्लू सापडले. तर दुसरे पिल्लू व मादी पसार झाले. वनविभागाने हे पिल्लू ताब्यात घेऊन त्यावर उपचार करून पुन्हा त्या ठिकाणी सोडले. मात्र ग्रामस्थांच्या आग्रहमुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अखेर वन विभागाने पिंजरा लावला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दोन वनकर्मचारी तैनात असल्याची माहिती वनपाल बी.बी. संकपाळ यांनी दिली.
चिंचणीत अखेर लावला पिंजरा
By admin | Updated: January 14, 2017 03:00 IST