शिरूर : भावांना धडा शिकवण्यासाठी सुरेश मोटे याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव करून नाहक एका व्यक्तीचा बळी घेतला. ओळख पटू नये, म्हणून मृतदेह जाळून टाकला. त्याच्या या अमानुष कृत्यामुळे भावकीला धडा शिकवण्याऐवजी तोच आता कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. २१ सप्टेंबरला सुरेश सोमा मोटे (वय ४९, रा. सविंदणे, ता. शिरूर) याचा खून झाल्याचा गुन्हा शिरूर पोलिसांत दाखल झाला होता. या प्रकरणी नाथू सोमा मोटे, आशिष नाथू मोटे, सचिन नाथू मोटे, कमल नाथू मोटे, योगेश शिवाजी मोटे, सुखदेव नाना मोटे, रंजना शिवाजी मोटे व सुनंदा बाबाजी मोटे यांना अटक झाली होती. तपासादरम्यान मृताची बनियन व सुरेश मोटे घालत असलेल्या बनियनच्या आकारामध्ये (सेंटिमीटर) तफावत आढळली. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी तपासाची दिशा बदलून मोटे जिवंत असल्याचे गृहीत धरून तपास केला. यात तो आळंदीत पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आपला खून केला, म्हणून भावकीच्या मंडळींवर कारवाई होईल, असा कट आखून मोटेने नाहक एकाचा बळी घेतला. शेवटी या वाईट कृत्यामुळे त्यालाच पोलीस कोठडीची हवा खावी लागली. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर मोटे याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. मोटे व त्याच्या भावकीचा वडिलोपार्जित जमीनवाटपावरून वाद होता. १६ सप्टेंबरला (२०१५) रामलिंग (ता. शिरूर) येथे एका लग्नसमारंभात त्यांचे भांडणही झाले होते. याचा फायदा घेऊन भावकीला धडा शिकवण्यासाठी मोटेने प्लॅन आखला. आनंद लक्ष्मण वाघ (रा. रांजणी, ता. आंबेगाव) या व्यक्तीने मोटेच्या घराचे वेल्डिंगचे काम केले होते. प्लॅनअंतर्गत मोटेने आनंदराव वाघ याला २० सप्टेंबरला रांजणीतून सविंदणे येथे आणले. रात्री तो झोपेत असताना त्याचा कुऱ्हाडीने वार करून खून केला, मृतदेहाची ओळख पटू नये, म्हणून पेट्रोल टाकून तो जाळला. मोटे मोबाईल बंद करून फरार झाला. दारातच जळता मृतदेह पाहून सुरेश मोटेच्या मुलाने चुलत्यांनी व त्याच्या मुलांनी वडिलांचा खून केल्याचा संशय घेऊन पोलिसांत तक्रार दिली.
भावांना धडा शिकविण्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव
By admin | Updated: October 5, 2015 01:24 IST