पुणे : जागा अपुरी पडू लागल्याने मार्केट यार्डातील भुसार बाजारावरील भार कमी करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जागेची पाहणी केली आहे. या जागेवर भुसार बाजाराचे टर्मिनल उभारण्याबाबत व्यापाऱ्यांनीही प्राथमिक होकार दर्शविला आहे. बाजार समिती व पुणे मर्चंट्स चेंबरचे पदाधिकारी काही दिवसांत एकत्रीतपणे या जागेची प्रत्यक्ष पाहणी करायला जाणार आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत मार्केट यार्डात घाऊक भुसार बाजार आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी भवानी व नाना पेठेतील व्यापाऱ्यांना याठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आली. सध्या या बाजारात सुमारे ५५० गाळे आहेत. पुणे शहराच्या झालेल्या वाढीबरोबरच येथील व्यापारही झपाट्याने वाढत गेला. भुसार बाजारात माल घेवून येणाऱ्या मोठ्या वाहनांवर सध्या अनेक बंधने आली आहेत. सकाळी नऊनंतर ही वाहने बाजारात आणणे शक्य होत नाही. मार्केट यार्डातील नेहरू रस्ता बाजार समितीच्या ताब्यात होता. कालांतराने शहर वाढल्यानंतर हा रस्ता महापालिकेने ताब्यात घेतला. त्यामुळे आता या रस्त्यालगत मोठी वाहने थांबविल्यानंतर कारवाई केली जाते. ग्राहकांच्या मागणीच्या तुलनेत बाजारात माल उतरविणे कठीण जावू लागले आहे. त्यामुळे सध्या येथील भुसार बाजाराचा भार कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. बाजार समितीने त्यासाठी जागांची चाचपणी सुरू केली असून थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जागेसह होळकरवाडी येथील गायरान जागेचा विचार सुरू आहे. त्यातही ‘यशवंत’च्या जागेला समितीकडून अधिक प्राधान्य असल्याचे समजते. लोकसंख्या वाढीच्या तुलनेने हा व्यवसाय दुपटी-तिपटीने वाढला. पण व्यवसाय वाढत असताना येथील अडचणींमध्येही वाढ होत गेली आहे. (प्रतिनिधी)>भुसार बाजारात कोंडी होत असल्याने ताण कमी करण्याची मागणी आहे. होळकरवाडी येथील गायरान जागेबाबतही सध्या चर्चा सुरू आहे. बाजार समितीकडून ‘यशवंत’च्या जागेबाबतची चर्चा करण्यात आली आहे. लवकरच दोन्ही जागा पाहण्यासाठी संयुक्तपणे जाणार आहोत. पण दोन्ही जागांपैकी एकाच ठिकाणी बाजार व्हायला हवा. व्यापारी दोन-तीन ठिकाणी विभागून जाणार नाहीत. सध्याचा बाजार आहे त्याच जागेवर नंतरही सुरू ठेवला जाईल. केवळ या बाजारावरील ताण कमी करण्यासाठी अन्य जागेचा विचार सुरू आहे. भवानी पेठ व नाना पेठेतील व्यापाऱ्यांसाठीही हे फायदेशीर ठरेल, असे पुणे मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी स्पष्ट केले.> वाहतुकीची अडचणकाही वर्षांपूर्वी बाजार सुरू झाला तेव्हा तो शहर मध्यवस्तीबाहेर होता. आता मार्केट यार्ड शहराचा एक भाग होऊन गेले आहे. परिसरात अनेक गृहनिर्माण सोसायट्या इतर व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे रस्ते अपुरे पडू लागले असून वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.