पुणे : ग्रामीण भागात महिलांसाठी आठवडे बाजार, बसस्थानकांच्या ठिकाणी स्वच्छतागृह, पाचवी व सातवीच्या मुलींना सायकल वाटप व जिल्हा क्रीडा प्रबोधनीची स्थापना, दुर्बल घटकांना स्वयंरोजगारासाठी झेरॉक्स मशिन पुरवणे, आदिवासी भागासाठी भात भरडणे यंत्र देणे, विधवा महिलांसाठी मोफत गॅस कनेक्शन आदी योजनांसाठी भरीव तरतूद असलेला जिल्हा परिषदेचा सन २०१५-१६ अर्थसंकल्प उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सादर केला.केंद्र आणि राज्य शासनाप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या तिजोरित यंदा खडखडाट आहे. गतवर्षीच्या तलुनेत यंदा अर्थंसंकल्पात सुमारे २० कोटींची घट झाली आहे. असे असताना वांजळे यांनी प्रथमच अनेक नाविन्यपूर्ण योजना सुरु करुन सर्वच घटकांना खूष करण्याचा प्रयत्न केला. यंदा १७८ कोटी ५० लाखांच्या अर्थसंकल्पात नियमानुसार २० टक्के म्हणजे ३१ कोटी ८० लाख रुपये समाजकल्याण विभाग आणि दहा टक्के म्हणजे १३ कोटी ९० लाख रुपये महिला बालकल्याण विभागासाठी तरतूद केली आहे. याशिवाय प्रथमच अपंग कल्याण व पुनर्वसन विभागासाठी स्वतंत्र तीन टक्के म्हणजे ८ कोटी १३ लाख रुपयांची खास तरतूद केली आहे. कृषी विभागासाठी ६ कोटी ८३ लाख रुपये, आरोग्य विभागासाठी ५ कोटी, शिक्षण विभागासाठी ८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर बांधकाम विभागासाठी केवळ ४८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.वांजळे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुधारीत (बीडाची) शवदाहीनीसाठी १० लाख रुपयांची तरतूद केली असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाकडाची बचत होणार आहे. याशिवाय ग्रामसभा, आपत्कालीन संदेश किंवा दवंडी देण्यासाठी ग्रामसंस्कार वाहिनी सुरु करणे, आठवडे बाजार, बसस्थानके आणि महामार्गाच्या ठिकाणी महिला व पुरुषासाठी स्वच्छतागृह बांधण्यासाठी १ कोटी रुपये, बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी फाईल ट्रॅकिंग प्रणाली तयार करणे, ५ वी ते ७ वीच्या शंभर टक्के मुली व मागासवर्गीय मुलांना सायकल पुरविणे तब्बल ८ कोटी रुपायंची तरतूद केली आहे. याशिवाय स्त्री जन्माचे स्वागत योजनेसाठी प्रथमच ३० लाखांची व ठिबक व स्प्रिंकलर सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.(प्रतिनिधी)