मढपासून पाच किलोमीटर अंतरावरील तळेरान अंतर्गत बोरीचीवाडी जवळील नानेघाटाकडे जाणाऱ्या पुष्पावती नदीवरील पूल जीर्ण झाला असून त्याची दुरवस्था झाली आहे. सदर पुलाचे सुरक्षा कठडे तुटलेले आहेत. त्याच बरोबर खालील बाजूने बांधकामातील गजसुद्धा बाहेर निघून तुटल्याने तो अधिक धोकादायक झाला आहे. माळशेज घाट आणि नाणेघाट या दोन पर्यटन स्थळांकडे येण्या-जाण्यासाठी पर्यटक तसेच आदिवासी परिसर असल्याने घाटघर , देवळे अजनावळे, खटकाळे, हीरडी, निमगिरी केवाडी, तळेरान, बगाडवाडी, पारगाव ,मढ येथील आदिवासी बांधवांना बाजार किंवा कामाच्या, मजुरीच्या निमित्ताने याच पुलाचा उपयोग होतो. एकूणच मोठ्या प्रमाणात वाहतूक या पुलावरून होते. त्यामुळे सदर पुलाचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. लोकनिर्वाचित प्रतिनिधी तसेच प्रशासनाकडून सदर काम मंजूर असल्याचे दोन वर्षांपासून सांगण्यात येत आहे. परंतु पुलाचे काम मात्र अद्यापपर्यंत मार्गी लागलेले नाही. तेव्हा सदर धोकादायक पुलाचा प्रश्न प्रशासनाने लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
बोरीची वाडी येथील पूल वाहतुकीसाठी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST