लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विरोधक आम्हाला काम करू देत नाहीत, त्यांचे वर्तन असेच राहिले तर त्यांना सभागृहाबाहेर घालवून देऊ या सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या वक्तव्याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मनसे या चारही विरोधी पक्षांनी महापालिका सर्वसाधारण सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. त्यांच्या अनुपस्थितीतच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तीन सभांचे कामकाज उरकून टाकले.त्यात टीडीआरसारखे महत्त्वाचे अनेक विषय होते. विरोधक सभागृहातच नसल्याने या विषयांवर कसलेही मतप्रदर्शन न होता ते सहजी मंजूर झाले. भिमाले यांनी काही दिवसांपूर्वी विरोधकांवर टीका करताना काम करू देत नसतील तर त्यांना सभागृहाबाहेर घालवू असे वक्तव्य केले होते. पीएमपीचा विषय संपताच विरोधकांनी हा विषय उपस्थित केला. भिमाले यांचा त्यांनी निषेध केला.महापौर मुक्ता टिळक यांनी सभेचे कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांनी त्यावर गदारोळ केला. मनसेच्या वसंत मोरे यांनी, तुम्ही कसला आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवता, आम्हीच तुम्हाला कात्रजचा घाट दाखवतो असे म्हटले. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनीही, आम्ही काय आमच्या घरातले प्रश्न उपस्थित करतो का? असा प्रश्न केला. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनीही टीका केली. योगेश ससाणे यांनी सत्ताधाऱ्यांची ही मनमानी असल्याची टीका केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सदस्या अश्विनी कदम, नंदा लोणकर व अन्य सदस्यांही यावर आक्रमक होत्या. भिमाले यांनी माफी मागावी अशी मागणी झाली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी समेट करण्याचा प्रयत्न केला. शिंदे, भोसले आदी गटनेते भिमाले यांच्याभोवती जमा झाले. त्यांनी माफी मागून विषय मिटेल असे सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र भिमाले यांनी तयारी दाखवली नाही.त्यानंतर मात्र विरोधकांनी एकत्र येत सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे आबा बागुल बहिष्कार नको असे म्हणत होते, मात्र कोणीही त्यांचे ऐकत नव्हते. अखेरीस बहिष्कार टाका पण तो कशासाठी टाकायचा त्याबद्दल भाषणे तरी करा, असे मत बागुल यांनी व्यक्त केले. अरविंद शिंदे व त्यांच्यात याबाबत चर्चा सुरू असतानाच चेतन तुपे यांनी, असे असेल तर आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकतो व सभात्याग करतो असे जाहीर केले. त्यामुळे सर्व विरोधी सदस्य सभागृहाबाहेर निघून गेले.
सर्वसाधारण सभेवर बहिष्कार
By admin | Updated: June 28, 2017 04:26 IST