खोर : दौंड तालुक्याच्या जिरायती भागामधील ग्रामस्थांनी या वर्षीच्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. देऊळगावगाडा (ता. दौंड) येथील साम्राज्य सेना ग्रुपचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी, सुनील बारवकर, दत्तात्रय काकडे तसेच शिवछत्रपती प्रतिष्ठान ग्रुपचे अध्यक्ष योगीराज शितोळे यांनी युवकवर्गाच्या माध्यमातून हा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवर ‘नोटा’चा वापर करून बहिष्कार घालण्याचे कारण म्हणजे जिरायती भागामधील हे गाव असून वर्षानुवर्षे या गावाचा पाणीप्रश्न आजपर्यंत प्रलंबितच राहिला आहे. आजतागायत देऊळगावगाडाला पुरंदर जलसिंचन योजनेतून व जनाई-शिरसाई योजनेच्या पाण्याचा लाभ मिळाला नाही. सर्वात कमी निधी विकासकामांकरिता या गावाला मिळाला आहे. गावातील ग्रामपंचायतीचा दारूबंदीचा ठराव असतानादेखील अनधिकृतपणे दररोज हातभट्टीचा व्यवसाय गावामध्ये चालू आहे. गावामध्ये विविध प्रभागांमध्ये व्यक्तिगत तसेच व्यायामशाळेचे असमान वाटप करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. देऊळगावगाडा परिसरातील रस्ते, पूल यांचा आजपर्यंत न झालेला विकास हा निवडणुकीला बहिष्कार घालणारा मुद्दा असल्याचे ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले आहे. विकासकामासाठी येणाऱ्या निधीमध्ये अनेक वेळा भ्रष्टाचार असल्याचे समजते, यासाठी या योजनेचे ठेकेदार स्थानिक गावातील रहिवासी असावा, असे येथील ग्रुपमधील युवकांचे म्हणणे आहे. यासंदर्भातील निवेदन दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे यांनादेखील देणार असल्याचे साम्राज्य सेना ग्रुपचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
देऊळगावगाडा येथे मतदानावर बहिष्कार
By admin | Updated: February 12, 2017 04:49 IST