देऊळगावराजे : बोरीबेल (ता. दौंड) हद्दीतील पाचपुते मळ्यातील रोहित्राच्या चोरीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतीची कामे खोंळबली असून, त्यांचे नुकसान होत आहे. बोरीबेल परिसरातील पाचपुते मळ्यातील विद्युत रोहित्राची सुमारे १ महिन्यापूर्वी चोरट्यांनी मोडतोड करून त्यातील महत्त्वाचे साहित्य लंपास केले. यामुळे येथील शेतकरी तसेच ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी, दौंड पोलीस ठाण्यात लेखी तक्रारीही दिल्या; मात्र संबंधित रोहित्रचोरांचा अद्यापही तपास लागला नाही. चोरट्यांनी तोडफोड केलेले रोहित्र अजूनही त्या ठिकाणीच पडून आहे. यामुळे संबंधित अधिकारी वर्गातून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार येथील शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे. विहिरींमध्ये पाणी आहे; मात्र ते शेतीला देण्यासाठी विद्युत पंपांना वीजपुरवठा नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्या शेतातील पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. या कामी संबंधितांनी लवकरात लवकर समस्या सोडविण्याची मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ वर्गातून करण्यात आली आहे. (वार्ताहर)
रोहित्राच्या चोरीमुळे बोरीबेल परिसर अंधारात
By admin | Updated: July 2, 2015 23:51 IST